

मॉस्को/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियातील ऑइल रिफायनरी चेन उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांची लाईफलाईन हादरली आहे. युक्रेनकडून सातत्याने होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे जूनमध्ये रशियातील पेट्रोल उत्पादन वर्षभरापूर्वीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे रशियात इंधन टंचाईन निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी इंधन विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या इंधन टंचाईत भारत रशियाच्या मदतीला धावून आला आहे. रशियातील हे संकट भारतासाठी इष्टापत्ती ठरले असून, त्यांनी आपले कच्चे तेल रिफाइन करण्यासाठी भारताकडे पाठवले आहे. यातून तयार होणारे पेट्रोल आणि डिझेलमुळे रशिया आपल्या इंधन टंचाईवर मात करीत असून, भारताला मात्र यातून दुहेरी फायदा होत आहे.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियातील अनेक रिफायनऱ्या बंद किंवा कमी क्षमतेने कार्यरत असल्याने रशियाला देशांतर्गत शुद्धीकरणाऐवजी अधिक प्रमाणात कच्चे तेल निर्यात करावे लागत आहे. अतिरिक्त पुरवठ्याचा सर्वाधिक फायदा भारताला झाला आहे. जून २०२६ मध्ये भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची आयात विक्रमी सुमारे २५ लाख बॅरल प्रतिदिन होण्याचा अंदाज असून, ती भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीच्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. भारतीय रिफायनऱ्यांना हे रशियन कच्चे तेल आंतरराष्ट्रीय दरापेक्षा प्रति बॅरल २ ते ५ डॉलर सवलतीत मिळत असल्याने आयात खर्चात बचत होत आहे. भारताने जून महिन्यात रशियाकडून विक्रमी प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केली आहे. जूनमध्ये भारताने रशियाकडून दररोज सुमारे २७ लाख बॅरल कच्चे तेल आयात केले. जूनमध्ये भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक वाटा रशियन तेलाचा होता, जो मे महिन्यात ३६.५ टक्के होता.
रशियाचे इंधन संकट
२५% जून २०२६ मध्ये पेट्रोल उत्पादनातील घट (वार्षिक तुलनेत)
१५% तेलजन्य उत्पादन निर्यातीत घट
११.६ दशलक्ष मेट्रिक टन मॉस्को रिफायनरीची वार्षिक कच्चे तेल शुद्धीकरण क्षमता (२०२४)
२.९ दशलक्ष टन मॉस्को रिफायनरीचे वार्षिक पेट्रोल उत्पादन
३.२ दशलक्ष टन मॉस्को रिफायनरीचे वार्षिक डिझेल उत्पादन
६ महिने मॉस्को रिफायनरी बंद राहण्याची शक्यता
१.७ दशलक्ष मेट्रिक टन रशियाकडे उपलब्ध पेट्रोलचा साठा (पुतीन यांच्या माहितीनुसार)
५०,००० मेट्रिक टन कझाकस्तानकडून मागविण्यात येणाऱ्या पेट्रोलचे प्रस्तावित प्रमाण