

Russia Drone Attack Ukraine :
रशियानं रविवारी युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. युक्रेनची राजधानी कीव आणि अनेक शहरांवर हा हल्ला करण्यात आला आहे. यात आतापर्यंत ४ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाली आहेत.
या हल्ल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान व्लादेमेर झेलेन्स्की यांनी दिली. त्यांनी रशियाचा हा जबरदस्त हल्ला १२ तास सुरू होता असं अधिकृत वक्तव्यात सांगितलं. त्यांनी हा हल्ला सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी मुद्दाम करण्यात आला असा आरोप देखील केला आहे.
संपूर्ण रात्र चाललेला या हल्ल्यासाठी रशियानं जवळपास ६०० ड्रोन्स आणि डझनभर मिसाईल्सचा वापर केला होता. युक्रेनची राजधानी कीववर आतापर्यंत करण्यात आलेला हा सर्वात मोठा एअर स्ट्राईक होता. गेल्या महिन्यात कीववर झालेल्या हल्ल्यात २१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
दरम्यान, रशियाचा हा ड्रोन अन् मिसाईल हल्ला सुरू होता त्यावेळी पोलंडची देखील लढाऊ विमानं आकाशात झेपावली होती. त्यांनी रशियानं अनेक ठिकाणी नाटो देशांच्या हवाई सीमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न थंडावले आहेत. झेलेन्स्की म्हणाले, 'रशियाला अजून लढायचं आणि मुडदे पाडायचे आहे. रशियावर जगानं अजून दबाव आणला पाहिजे.'
दरम्यान, नाटो देश डेन्मार्कनं देखील आपल्या हवाई हद्दीतील सुरक्षा वाढवली आहे. नाटो देशांच्या हवाई हद्दीत देखील अनेक हालचाली होत आहेत. डेन्मार्कन आपल्या हवाई हद्दीत ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे. डेन्मार्कचे मंत्र्यांनी सध्याची सुरक्षा स्थिती ही अत्यंत कठिण असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, 'नुकतेच आम्हाला अनुभव आला आहे. विदेशातील ड्रोन्सनी आमच्या समाजासाठी धोका निर्माण करणं आणि अनिश्चितता निर्माण करणं हे आम्ही कधीही मान्य करणार नाही.' याचबरोबर डेन्मार्कमध्ये पुढच्या आठवड्यात युरोपियन युनियनमधील नेत्यांची बैठक होणार आहे. त्यावेळी आपण अतिरिक्त सुरक्षेवर जास्त लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं डेन्मार्कच्या मंत्र्यांनी सांगितलं.
डेन्मार्कच्या ५ एअर पोर्ट्सच्या जवळ गुढ ड्रोन हालचाली होण्याची ही घटना गेल्या आठवड्यात देखील झाली होती. आता पुन्हा असा प्रयत्न झाल्यानंत उत्तर युरोपात सुरक्षेबाबत मोठी काळजी व्यक्त केली जात आहे.