

Republic of Balochistan
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तानमधील चार दिवसांच्या संघर्षानंतर दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. तथापि, ऑपरेशन सिंदूर आणि भारताला बलुचिस्तानने पहिल्यापासून पाठिंबा दिला आहे. किंबहुना पाकिस्तानापासून स्वातंत्र्यासाठी त्यांनी वेळोवेळी भारताची मदतही मागितली आहे.
दरम्यान, आता ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे. त्यामुळे सोशल मीडियात रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
विशेष म्हणजे, एक्सवर याबाबत बीएलए च्या नेत्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भारताकडेही मागणी करण्यात आली आहे.
बुधवारी 14 मे 2025 रोजी एक्सवर ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. बलुचिस्तानमधील नागरिकांना स्वतंत्र बलुचिस्तानचा नकाशा आणि बलुचिस्तानचा ध्वज फडकवतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
9 मे रोजी बलुच कार्यकर्ते मीर यार बलुच यांनी X वर एक पोस्ट करत लिहिले होते की, “आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि भारताला विनंती करतो की त्यांनी दिल्लीत बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय व दूतावास उघडण्यास परवानगी द्यावी. पाकिस्तान हा दहशतवादी देश कोसळण्याच्या मार्गावर आहे.”
त्यांनी संयुक्त राष्ट्रांनाही विनंती केली की त्यांनी “डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बेलुचिस्तान” या स्वतंत्र देशाला मान्यता द्यावी आणि सर्व UN सदस्य देशांची बैठक बोलवावी. चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी निधीची मदत मिळाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढच्या पोस्टमध्ये मीर यार बेलुच यांनी फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये स्थानिक लोक ‘भारत आणि बलुचिस्तान मैत्री’ दर्शवणारे फलक हातात धरून उभे होते.
त्यासोबत त्यांनी लिहिले आहे की, “डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानच्या नागरिकांचा भारताच्या जनतेला पूर्ण पाठिंबा देतात. चीन पाकिस्तानला मदत करत आहे, पण बलुचिस्तान आणि त्यांचे नागरीक भारताच्या बाजूने आहेत.
त्यांनी पुढे भारताच्या पंतप्रधानांना उद्देशून लिहिले, “नरेंद्र मोदीजी, तुम्ही एकटे नाही, 60 दशलक्ष बलुच देशभक्त तुमच्या पाठीशी आहेत.”
लुच नेते मीर यार बलुच यांनी म्हटले आहे की, भारतीय मीडियाने बलुच नागरिकांना पाकिस्तानचे नागरिक संबोधू नये. आम्ही जेव्हा ब्रिटिश बलुचिस्तान आणि हा उपखंड सोडून जात होते तेव्हा 11 ऑगस्ट 1947 रोजीच आमचे स्वातंत्र्य घोषित केले होते.
प्रिय भारतीय देशभक्त मीडिया, युट्युबवरील सहकारी आणि भारताचे रक्षण करणारे विचारवंत तुम्हाला नम्र विनंती आहे की बलुच लोकांना ‘पाकिस्तानचे लोक’ असे संबोधू नका.
आम्ही पाकिस्तानी नाही, आम्ही बलुचिस्तानी आहोत. पाकिस्तानचे लोक म्हणजे पंजाबी ज्यांना कधीही हवाई बॉम्बहल्ले, अपहरण किंवा नरसंहार सहन करावा लागलेला नाही.
14 मे 2025 रोजी मीर यार बेलुच यांनी आणखी एक पोस्ट करत लिहिले, “ब्रेकिंग न्यूज: बलुचिस्तान भारताच्या पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर (PoK) रिकामं करण्याच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देतो.
आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला त्वरीत PoK रिकामं करण्यास भाग पाडलं पाहिजे, अन्यथा 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी ढाकामध्ये शरण गेल्यासारखी दुसरी नामुष्की पाकिस्तानला सहन करावी लागेल.”
त्यांनी हेही लिहिले की, “भारत पाकिस्तानच्या लष्कराला पराभूत करण्यास सक्षम आहे. जर पाकिस्तानने याकडे दुर्लक्ष केले, तर फक्त पाकिस्तानी लोभी लष्करी जनरल्स जबाबदार असतील, कारण इस्लामाबाद PoK मधील लोकांचा वापर मानवी ढाल म्हणून करत आहे.”