

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत तिसर्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली असून, या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारदेखील झाले आहेत. दरम्यान, दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
या दौर्याच्या दुसर्या दिवशी महाराष्ट्राने प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार केले. या करारांच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीसोबतच ज्ञान आणि तंत्रज्ञान आणणे शक्य होणार आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना मिळून विविध क्षेत्रांत परिणामकारक पद्धतीने काम करता येईल. नागरी क्षेत्रातील नियोजन आणि परिवहन क्षेत्रातील धोरणात्मक करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूक सुविधांची संरचना सुधारता येणार आहे. या द़ृष्टीने या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांशी संवाद, समन्वय साधता आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या धोरणात्मक करारांत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह-लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजियन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग-सिंगापूर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंग यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगिक पट्टा विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. शासन आणि बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील धोरणात्मक आणि प्रभावी औद्योगिक विकासाला चालना देता येणार आहे. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांची भेट झाली. या भेटीत उभयतांनी विविध विषयांवर धोरणात्मक चर्चा केली.
ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. राज्य सरकारने जाहीर केलेले ईव्ही धोरण अतिशय चांगले असून, येणार्या काळात 5 नवीन ईव्ही मॉडेल्स आणणार असल्याचे किम यांनी सांगितले. फिनलंडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकासमंत्री विले त्याविओ यांचीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेत भारत आणि फिनलंडमधील सहकार्याबाबत चर्चा केली. मुंबई येथे मे-जून महिन्यात सर्क्युलर इकॉनॉमीसंदर्भात एक परिषद आयोजित करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. इस्रायल इनोव्हेशन अॅथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल यांच्याशी विविध नावीन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात भागीदारीबाबत सविस्तर चर्चा झाली. हॅवलेट पॅकर्डच्या अध्यक्ष पॅट्रिका रुसो आणि उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्र्यू पॉनेक यांच्याशी थर्मल एनर्जी साठवणूक सोल्यूशन्स, झीरो कार्बन इंडस्ट्रियल हीट इत्यादींबाबत चर्चा झाली. एमआयटी मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रोसेनवर्सेल यांचीही त्यांनी भेट घेतली.