

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात (Israel-Hamas war) युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या चर्चेतून मध्यस्थ म्हणून कतारने (Qatar) माघार घेतली. कतारने शनिवारी हमास आणि इस्रायल यांच्यातील मध्यस्थीचे प्रयत्न स्थगित केल्याची घोषणा केली. गाझासाठी (Gaza) युद्धविराम वाटाघाटीबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे कतारने नाराजी व्यक्त करत चर्चेतून माघारी घेतली. जेव्हा इस्रायल आणि हमास वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त करतील; तेव्हाच ते आपले काम पुन्हा सुरू करतील, असे कतारने स्पष्ट केले आहे.
कतारने हा निर्णय अशावेळी घेतला आहे; जेव्हा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी कथितरित्या सांगितले आहे की अमेरिका यापुढे कतारमध्ये हमासच्या प्रतिनिधींची उपस्थिती स्वीकारणार नाही. गाझापट्टीत सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी हमासने नवा प्रस्ताव फेटाळल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
दरम्यान, कतारने मध्यस्थी करण्याच्या भूमिकेपासून स्वतःला दूर केले असल्याचे म्हटले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "एखाद्या वाटाघाटीपर्यंत पोहोचण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून, कतारने १० दिवसांपूर्वी सर्व पक्षांना सूचना केली होती की जर या चर्चेदरम्यानदरम्यान कोणताही तोडगा झाला नाही तर ते इस्रायल आणि हमास यांच्यातील मध्यस्थांच्या भूमिकेपासून स्वतः दूर होतील."
''जेव्हा दोन्ही पक्ष युद्धविरामासाठी इच्छा आणि गांभीर्य दाखवतील तेव्हाच कतार त्यांचे मध्यस्थ म्हणून प्रयत्न पुन्हा सुरू करेल." असे कतारने म्हटले आहे. ओबामा प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर २०१२ पासून कतारच्या राजधानीत हमासचे राजकीय कार्यालय सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
एक वर्षापासून सुरु असलेल्या इस्रायल- हमास युद्धात गाझामधील ४३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. या युद्धाची सुरुवात ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती; जेव्हा दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात १,२०० लोक मारले गेले आणि २५० जणांना ओलिस ठेवण्यात आले. यातील १०० जण अजूनही गाझामध्ये जिवंत असल्याचे समजते.