

Qatar Gas Hub Explosion: जगातील सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक वायू (LNG) केंद्रांपैकी एक असलेल्या कतारच्या रास लाफान औद्योगिक परिसरात रविवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान 54 जण जखमी झाले असून 18 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती कतारच्या गृह मंत्रालयाने दिली आहे. या घटनेमुळे केवळ कतारच नव्हे तर जागतिक ऊर्जा बाजारातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रास लाफान इंडस्ट्रियल सिटीमधील एका गॅस प्रकल्पात स्फोट झाला. सुरुवातीला जखमींची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही तासांनंतर अधिकृत आकडेवारी जाहीर करताना 54 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच 18 जणांचा शोध सुरू असून बचाव पथके घटनास्थळी कार्यरत आहेत.
कतारएनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बारझान गॅस सप्लायमध्ये उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू करत असताना स्फोट झाला आणि त्यानंतर मोठी आग लागली. तातडीने आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. स्फोटामुळे झालेल्या आर्थिक आणि भौतिक नुकसानाचा अंदाज अद्याप समोर आलेला नाही.
रास लाफान हे जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्रांपैकी एक मानले जाते. कतार हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि रशियासह जगातील प्रमुख नैसर्गिक वायू उत्पादक देशांमध्ये गणला जातो.
याआधीही अमेरिका-इराण संघर्षादरम्यान रास लाफान प्रकल्पाला मोठा फटका बसला होता. इराणच्या हल्ल्यांनंतर आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे कतारला काही काळ गॅस उत्पादन बंद करावे लागले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीमुळे LNG निर्यात क्षमतेत जवळपास 17 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
सध्या कतार सरकार आणि कतारएनर्जी कंपनी रास लाफान प्रकल्प पूर्ण क्षमतेने पुन्हा कार्यरत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत उत्पादन क्षमता 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या स्फोटानंतर जागतिक ऊर्जा बाजाराचे लक्ष पुन्हा कतारकडे लागले आहे. कारण रास लाफान प्रकल्पाची लवकर पुनर्बांधणी झाली तर नैसर्गिक वायूच्या जागतिक किमतींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र उत्पादनात आणखी विलंब झाल्यास ऊर्जा बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.