

तेहरान, दुबई, दोहा : मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आखाती प्रदेशातील अनेक देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका कायम ठेवली आहे. अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात येत असल्याचे तेहरानने स्पष्ट केले आहे. या हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सौदीत अमेरिकेच्या पाच विमानांचे नुकसान झाले.
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पूर्व आणि उत्तर भागात अनेक ड्रोन हल्ले हाणून पाडण्यात आले. तसेच अल-खार्ज प्रांताच्या दिशेने डागण्यात आलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रही सौदी लष्कराने हवेतच निष्प्रभ केले.दरम्यान, द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियातील एका एअरबेसवर उभ्या असलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या पाच इंधन भरणाऱ्या विमानांना नुकत्याच झालेल्या हल्ल्यात नुकसान झाले. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा हल्ला इराणकडून करण्यात आला असण्याची शक्यता आहे. मात्र, या वृत्तावर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
कतारच्या संरक्षण मंत्रालयानेही शनिवारी पहाटे क्षेपणास्त्र हल्ल्यांची नोंद केली. रात्री सुमारे 2 वाजता एक क्षेपणास्त्र अडवण्यात आले, तर नंतर सकाळी आणखी एक हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. काही भागांतील रहिवाशांना राष्ट्रीय सतर्कता प्रणालीद्वारे तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रभावित नागरिकांसाठी पर्यायी सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यात आल्याचे कतार सरकारने सांगितले. दोहा शहरात शनिवारी पहाटे सुमारे 1.30 वाजता आकाशात मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अनेक नागरिकांना काही तास बेसमेंटमध्ये आश्रय घ्यावा लागला. कुवैत नॅशनल गार्डनेही देशाच्या सुरक्षेसाठी गस्त घालत असताना एक ड्रोन पाडल्याची माहिती दिली.