मॉस्को, वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन पुन्हा उत्तर कोरियाच्या दोन दिवसीय दौर्यावर जाणार आहेत. ही त्यांची उत्तर कोरियाची दुसरी भेट आहे. पुतीन यांच्या संभाव्य उत्तर कोरिया दौर्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. या दौर्यात पुतीन उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची भेट घेणार आहेत. पुतीन उत्तर कोरियाहून व्हिएतनामला भेट देऊ शकतात, असे सांगत क्रेमलिनने पुतीन यांच्या उत्तर कोरियाच्या दौर्याला मैत्रीपूर्ण राज्य भेट म्हटले आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील सुनान आंतरराष्ट्रीय विमानतळावर किम जोंग उन स्वत: पुतीन यांचे स्वागत करतील. यासोबतच त्यांची बहीण किम यो जोंग आणि मुलगी किम जू ए उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुतीन यांच्या उत्तर कोरियाच्या संभाव्य दौर्यासाठी सुरू असलेली तयारीही सॅटेलाईट छायाचित्रातून दिसून आली. किम जोंग आवश्यक शस्त्रास्त्रांच्या बदल्यात आर्थिक मदत आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाशी संबंधित रशियाशी करार करू शकतात, असे बोलले जात आहे. कारण युक्रेन युद्धासाठी रशियाला आणखी शस्त्रास्त्रांची गरज आहे.
युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून उत्तर कोरिया आणि रशियातील लष्करी आणि आर्थिक सहकार्य वेगाने वाढले आहे. उत्तर कोरियाने रशियाला दारूगोळा, क्षेपणास्त्रे आणि अन्य लष्करी साहित्य पुरवल्याचा आरोप अमेरिका आणि दक्षिण कोरियाने केला आहे.