

Paracetamol:
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरासिटामॉल या औषधाबद्दल एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने जन्माला येणाऱ्या बाळाला ऑटिझमचा धोका वाढतो. त्यांनी यासंदर्भात गर्भवती महिलांसाठी इशारा देखील दिला आहे.
व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, "मला वाटते की आपल्याला ऑटिझमचे उत्तर मिळाले आहे. गर्भधारणेच्या काळात महिलांकडून एसिटामिनोफेन (Acetaminophen) औषधाचा वापर केल्याने बाळांमध्ये ऑटिझमचा धोका वाढतो." पॅरासिटामॉल हे अमेरिकेत एसिटामिनोफेन या नावाने ओळखले जाते, जे टायलेनॉल (Tylenol) सारख्या ब्रँड नावाने विकले जाते. ट्रम्प यांनी गर्भवती महिलांना पॅरासिटामॉलचा वापर केवळ अत्यंत आवश्यक असेल तरच करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या निर्णयामागे त्यांचे आरोग्य मंत्री रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर असल्याचे म्हटले जाते, जे पर्यावरणीय घटक आणि औषधांचा संबंध ऑटिझमशी तपासण्यासाठी ओळखले जातात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर, यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) ने गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉलच्या लेबलवर या धोक्याचा इशारा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतात पॅरासिटामोल हे गर्भधारणेदरम्यान सर्वात सुरक्षित औषध मानले जाते. त्यामुळे, या दाव्यामुळे भारतातही चिंता वाढली आहे.
मात्र, अनेक आरोग्य तज्ञांनी ट्रम्प यांच्या या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे. त्यांच अस मत आहे की, ऑटिझमच्या वाढत्या प्रमाणामागे कोणते पर्यावरणीय घटक आहेत हे सिद्ध करण्यासाठी अजून सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांनी यापूर्वी लसींमुळे ऑटिझम होतो असा दावा केला होता, जो अनेक वैज्ञानिक अभ्यासातून खोटा ठरला आहे.
पॅरासिटामॉल हे एक सुरक्षित औषध आहे आणि त्याच्या वापराबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही, असे बालरोगतज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, "पॅरासिटामॉल आणि ऑटिझम यांच्यात संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा मला दिसत नाही. अनेक अभ्यासातून पॅरासिटामॉलची उपयुक्तता सिद्ध झाली आहे आणि त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे औषध वापरण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय सल्ल्यासाठी Google चा वापर न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
"कोणत्याही औषधाचा, पॅरासिटामॉलचाही, दीर्घकाळ वापर केल्यास नुकसान होऊ शकते. पॅरासिटामॉलमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते, परंतु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास ते सुरक्षित आहे. याचे फायदे धोक्यांपेक्षा जास्त आहेत," असे त्या म्हणाल्या.
पॅरासिटामॉल हे सर्वात सुरक्षित औषधांपैकी एक आहे आणि 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनेकॉलॉजी अँड ऑबस्टेट्रिक्स' (FIGO) ने देखील त्याच्या वापराची शिफारस केली आहे. घाबरून जाण्याची गरज नाही ट्रम्प असे काही असंभाव्य दावे करतात ज्यांना वैज्ञानिक पुराव्यांचा आधार नसतो, असे डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले.