पुढारी ऑनलाईन डेस्क: Earthquake in Tibet | भारताच्या शेजारील देश तिबेट मंगळवारी (दि.७) शक्तीशाली भूकंपाने हादरले. तिबेटच्या सर्वात पवित्र शहरांपैकी एक असलेल्या हिमालयाच्या उत्तरेकडील पायथ्याशी ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. यामधील मृतांचा आकडा 100 पार झाला आहे. या शक्तीशाली भूकंपाने शेजारील नेपाळ आणि भारतात देखील हादरे बसल्याचे वृत्त 'रॉयटर्स'च्या हवाल्याने दिले आहे.
चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता (बीजिंग वेळेनुसार) भूकंप झाला, ज्याचे केंद्रबिंदू एव्हरेस्ट प्रदेशाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण काउंटी टिंगरी येथे १० किमी (६.२ मैल) खोलीवर होते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हिसने भूकंपाची तीव्रता ७.१ नोंदवली आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळ असलेल्या झिझांग येथे सकाळी ६:३५ वाजता पहिला ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तिबेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या शिगात्से शहरात चिनी अधिकाऱ्यांनी 6.8 तीव्रता नोंदवली. त्याच झिझांग परिसरातून ४.७ आणि ४.९ तीव्रतेचे दोन धक्के जाणवले.
तिबेटमधील या प्रलयकारी भूकंपानंतर चीनच्या सरकारी टेलिव्हिजनने सहा तासांनंतर वृत्त दिले की, तिबेटच्या बाजूला किमान ९५ लोक ठार झाले तर १३० जण जखमी झाले आहेत. शक्तीशाली भूकंपाचा केंद्रबिंदू हा जगातील सर्वात उंच पर्वत आणि गिर्यारोहक आणि ट्रेकर्ससाठी लोकप्रिय असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या उत्तरेस सुमारे ८० किमी (५० मैल) अंतरावर होता.
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए) सांगितले की, तिबेटच्या सीमेवरील सात पर्वतीय जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. चीनच्या नैऋत्य भागात, नेपाळमध्ये आणि उत्तर भारतात भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे वारंवार भूकंप होतात, असेही रॉयटर्सनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.