

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅथलिक चर्चचे प्रमुख आणि ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षाचे होते. पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी सकाळी ७:३५ वाजता निधन झाले, अशी माहिती व्हॅटिकनने (Vatican) दिली. पोप यांच्या कार्यकाळात चर्चच्या कारभाराचे निरीक्षण करणारे व्हॅटिकन कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
"आज सकाळी ७:३५ वाजता, रोमचे बिशप, फ्रान्सिस यांचे देहावसान झाले," असे कार्डिनल फॅरेल यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. "त्यांचे संपूर्ण आयुष्य देवाच्या आणि चर्चच्या सेवेसाठी समर्पित राहिले." असेही त्यांनी नमूद केले आहे.
पोप फ्रान्सिस यांना फेब्रुवारी महिन्यात न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस हे २६६वे पोप होते. ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम तर पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर (इ.स. ७३१-७३४) पोपपदी येणारा पहिले युरोपाबाहेरचे पुरुष होते. २०२२ मध्ये त्यांनी कॅनडाला भेट दिली. त्यांनी स्थानिक लोकांची चर्चने केलेल्या अत्याचारांबद्दल माफी मागितली होती.
पोप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोपपद स्वीकारले होते. पोप हे कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू असतात. ते व्हॅटिकन सिटीमधून जगभरातील भाविकांना संबोधित करतात.
पोप फ्रान्सिस यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ म्हणून झाला. त्यांच्या दशकभराच्या पोपपदाच्या कार्यकाळात दया, समावेशकता, नम्रता आणि पर्यावरण आणि उपेक्षित लोकांची विशेष काळजी घेण्यावर भर दिला.
पोप फ्रान्सिस यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनाच्या ब्यूनस आयर्स शहरात झाला. त्यांचे वडील इटालियन स्थलांतरित होते. त्यांनी १९५८ मध्ये गंभीर आजारातून बरे झाल्यावर सोसायटी ऑफ जीसस (Society of Jesus) मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
पोप म्हणून कार्य
२८ फेब्रुवारी २०१३ रोजी पॉप बेनेडिक्ट XVI यांनी राजीनामा दिल्यानंतर, १३ मार्च २०१३ रोजी झालेल्या पॉपल कॉन्क्लेव्हमध्ये बर्गोग्लियो यांची पोप फ्रान्सिस म्हणून निवड झाली. त्यांनी सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी यांच्या नावावरून 'फ्रान्सिस' हे पोप नाव घेतले. पोप म्हणून त्यांनी चर्चमध्ये सुधारणा, गरीबांसाठी सहानुभूती आणि इतर धर्मीय समुदायांसोबत संवाद वाढवण्यावर भर दिला.
आत्मचरित्र आणि विचारधारा
२०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या 'Hope' या आत्मचरित्रात पॉप फ्रान्सिस यांनी त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या लहानपणीच्या अनुभवांपासून ते पोप म्हणून त्यांच्या कार्यापर्यंत विविध मुद्द्यांवर विचार मांडले आहेत. या आत्मचरित्रात त्यांनी विश्वास, संघर्ष, आणि आशा यांचे दर्शन घडवले.
पर्यावरण आणि सामाजिक न्याय
पोप फ्रान्सिस हे पर्यावरणीय संकटाबद्दल जागरूक होते. २०१५ मध्ये त्यांनी पर्यावरणीय संकट आणि त्यावर उपाययोजना यावर भाष्य केले. त्यांनी आधुनिक काळातील व्यक्तिवाद, सामाजिक आणि आर्थिक विषमता, आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर चिंता व्यक्त केली होती.