Narendra Modi On Nepal :
नेपाळच्या आंदोलनकर्त्यांनी देशाच्या माजी प्रमुख न्यायाधीश सुशिला कार्की यांची नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी निवड केली. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशिला कार्की यांचे अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून कार्की यांचं अभिनंदन केलं.
मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय सुशिला कार्की जींचे ह्रदयापासून अभिनंदन. भारत हा नेपाळमधील शांतता, प्रगती आणि भरभराटीसाठी कटीबद्ध आहे.
नेपाळ आणि भारत हे दोन्ही देश १ हाजर ७५१ किलोमीटरची सीमा शेअर करतात. ही सीमा सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना लागून आहे. भारत आणि नेपाळ यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ऋणानुबंध आहेत. त्यामुळं या दोशातील नागरिकांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्याचबरोबर धर्म, भाषा आणि संस्कृतीमध्ये देखील बरेच साधर्म आहे.
भारताच्या नेबर फर्स्ट या धोरणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून पाचवेळा नेपाळला भेट दिली आहे. तर नेपाळच्या पंतप्रधानांनी २०१४ पासून १० वेळा भारताला भेट दिली आहे.
शुक्रवारी अधिकृतरित्या नेपाळची संसद भंग करण्यात आली. आता ५ मार्च २०२६ मध्ये नव्यानं निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कार्की यांच्याकडे देशाची सूत्र असणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती कार्यालयानं संसद भंग करण्याचा निर्णय हा कार्की यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलाय. आता नव्या अंतरिम सरकारवर सहा महिन्यात देशात निवडणुका घेण्याचा प्रमुख जबाबदारी असणार आहे.
कार्की यांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान शीतल निवास इथं पंदाची शपथ घेतली. त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत. नव्या सरकारवर देशातील स्थिती सामान्य करणे, देशात नव्यानं निवडणुका घेण्याबाबत वातावरण निर्मिती करणं या दोन प्रमुख जबाबदाऱ्या असतील. कार्की यांची निवड ही नेपाळमधील gen z यांनी ऑनलाईन वोटिंग करून केली.
सुशिला कार्की यांच्या निवडीनंतर लगेचच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलं. भारतानं नेपाळच्या नव्या अंतरिम सरकारचं स्वागत केलं. यामुळं देशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित होईल अशी आशा देखील व्यक्त करण्यात आली. याचबरोबर दोन्ही देशातील नागरिकांच्या भल्यासाठी आम्ही नेपाळसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत असं देखील या वक्तव्याद्वारे सांगण्यात आलं.