

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी सांगितले. सोमवारी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली. पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात त्यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पीएम मोदी यांच्याशी फोनवरुन झालेल्या सकारात्मक संवादानंतर ट्रम्प यांनी ही माहिती दिली. पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील.
"सोमवार सकाळी मी त्यांच्याशी फोनवरून बराच वेळ चर्चा केली. ते पुढील महिन्यात, कदाचित फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये (White House) भेटीला येतील. भारताशी आमचे द्विपक्षीय संबंध खूप चांगले आहेत," असे ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथून जॉइंट बेस अँड्र्यूज येथे परतताना एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी सांगितले.
पीएम मोदी यांच्याशी झालेल्या फोन कॉलवरील चर्चेनंतर ट्रम्प यांनी ही माहिती दिली. याबाबत व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदी यांनी द्विपक्षीय सहकार्य वाढवणे आणि ते मजबूत करण्याबाबत चर्चा केली. त्यांनी इंडो-पॅसिफिक, मध्य पूर्व आणि युरोपमधील सुरक्षा मुद्यावरही चर्चा केली.
"आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली, असेही निवेदनात नमूद केले आहे. "अमेरिकेत निर्मिती केलेल्या सुरक्षा उपकरणांची खरेदी वाढवणे आणि निष्पक्ष द्विपक्षीय व्यापार संबंधांच्या दिशेने पाऊल उचलण्याचे महत्त्व अधोरेखित केले," असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
पीएम मोदी आणि ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान, अमेरिका-भारत यांच्यात द्विपक्षय धोरणात्मक भागीदारी आणि इंडो-पॅसिफिक क्वाड भागीदारी पुढे नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर भर दिला. या वर्षाच्या अखेरीस भारत पहिल्यांदाच क्वाड नेत्यांच्या परिषदेचे आयोजन करणार आहे.