

पुढारी ऑनलाईन डेस्क: Canada airport Plane flips | कॅनडात सोमवारी (दि.१७) मोठी विमान दुर्घटना घडली. डेल्टा एअरलाइन्सचे विमान क्रमांक ४८१९ क्रॅश झाले. हे विमान मिनियापोलिस-सेंट पॉल विमानतळावरून टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. टोरंटो पियर्सन विमानतळावर उतरताना ते उलटले. विमानात ८० लोक होते, ज्यात ७६ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, परंतु अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हे विमान डेल्टा ब्रँड अंतर्गत एंडेव्हर एअरद्वारे चालवले जात होते. टोरंटो पिअर्सन येथे उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले. आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, परंतु अपघातात १५ जण जखमी झाले. जखमींमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीला टोरंटोमधील सेंट मायकल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसऱ्या व्यक्तीला सनीब्रुक हेल्थ सायन्सेस सेंटरमध्ये हलवण्यात आले.