पुढारी ऑनलाईन डेस्क : समुद्रकिनारे आणि प्रवाळ खडकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पापुआ न्यू गिनी देशात शनिवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पापुआ न्यू गिनीमधील न्यू ब्रिटन प्रदेशाच्या किनाऱ्यावर ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला, असे युरोपियन-भूमध्य भूकंपशास्त्रीय केंद्राने (EMSC) सांगितले. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही.
ईएमएससीने सांगितले की भूकंपाची खोली ४९ किलोमीटर (३०.४५ मैल) होती आणि यूएस त्सुनामी वॉर्निंग सेंटरने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम नेपाळमध्ये तीन मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, जाजरकोट जिल्ह्यात रात्री ८:०७ वाजता ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर लगेचच रात्री ८:१० वाजता ५.५ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. दोन्ही भूकंपांचे केंद्रबिंदू काठमांडूपासून सुमारे ५२५ किलोमीटर पश्चिमेला असलेल्या जाजरकोट येथील पणिक क्षेत्र होते. नेपाळसह उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले.
गेल्या महिन्यात म्यानमार आणि थायलंडमध्ये मोठे भूकंप झाले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. गुरुवारी, म्यानमार सरकारने माहिती दिली की, भूकंपात आतापर्यंत ३,०८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीत ४,७१५ लोक जखमी झाले आहेत, तर ३४१ लोक अजूनही बेपत्ता आहेत.