

पुढारी ऑनलाईन डेस्क : नैॠत्य पाकिस्तानमधील बलुच बंडखोरांनी ३० सैनिकांची हत्या करून अख्खी रेल्वेच ताब्यात घेतली. त्यात सुमारे ४०० प्रवासी होते. त्यातील २१४ जणांना ओलीस ठेवण्यात आले. ४८ तासात बलुचिस्तान भागातून लष्कर मागे न घेतल्यास या सर्व प्रवाशांना ठार करण्याची धमकी बलुच दहशतवाद्यांनी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या लष्काराने १६ दहशतवाद्यांना ठार करून सुमारे १०४ प्रवाशांची सुटका केल्याचे म्हटले आहे.
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टाहून ही रेल्वे पेशावरला निघाली होती. त्यावेळी त्यावर गोळीबार करण्यात आला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टाहून पेशावरला जाणारी ही रेल्वे बोगद्यात अडकली आहे. त्यात ४०० प्रवासी आहेत. रेल्वेचालक गंभीर जखमी झाला. अतिरेक्यांनी काही प्रवाशांना डोंगरात नेले आहे. सुरक्षा दल त्यांचा पाठलाग करत असून पर्वतीय क्षेत्रात बंडखोरांशी चकमक सुरू असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. अपहरण केल्यानंतर सुरक्षा दलांनी किमान १६ दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार केले आणि १०४ प्रवाशांची सुटका केली. सुटका केलेल्यांपैकी ५८ पुरुष, ३१ महिला आणि १५ मुलांना दुसऱ्या ट्रेनने बलुचिस्तान प्रांतातील माच या दुसऱ्या शहरात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असणार्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही २० सैनिकांची हत्या करून एक ड्रोनही पाडला आहे. आम्ही १८२ जणांना ओलीस ठेवले आहे. त्यात पाकिस्तानी सैन्याच्या काही अधिकार्यांचा समावेश आहे. नागरी प्रवासी विशेषत: महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्यांची सुरक्षित सुटका केली आहे, असे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पत्रकारांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. जर लष्कराचा हस्तक्षेप कायम राहिला, तर सर्व ओलिसांना ठार मारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.