

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : प्रत्येक दहशतवादी कुरापतीनंतर भारताकडून पराभवाची धूळ चाटणार्या पाकिस्तानची मस्ती अजूनही कायम आहे. अवघ्या १५ महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने उद्ध्वस्त केलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अड्डा पुन्हा उभारण्यात आला असून बहावलपूर येथील या उद्ध्वस्त इमारतीचे पुननिर्माण केले गेले आहे. यासाठी पाकिस्तान सरकारने ‘जैश’ला प्रथम २५ कोटी पाकिस्तानी रुपये रोख आणि १५ महिन्यात ११ कोटी रुपये उभारणीसाठी दिले गेल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर‘मध्ये ‘जैश’चे बहावलपूरस्थित मुख्यालय ‘मरकज सुभान अल्लाह’ उद्ध्वस्त केले होते. मात्र आता या इमारतीचे पुन्हा बांधकाम झाल्याची माहिती हाय रिझोल्यूशन सॅटेलाईट फोटो व गुप्तचर अहवालांतून समोर आली आहे. या परिसराच्या नव्या फोटोंत वेगाने सुरू असलेले बांधकाम स्पष्ट दिसते.
भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त मशिदीच्या घुमटांवर नवीन प्लास्टर केले गेले असून नवीन सिमेंट उठून दिसत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ही इमारत कोसळून तेथे ढिगारा साचला होता. मात्र आता तेथे हालचाली वाढल्या आहेत. मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान हा ढाचा पाडून नव्याने बांधकाम सुरू केले गेले होते. ‘जैश’च्या सोशल मीडियावरून डिजिटल वॉलेटद्वारे या अड्ड्याच्या पुनर्बांधणीसाठी मोहीम राबवून निधी उभारण्यात आला.