
Pakistan PM Shehbaz Sharif on Pahalgam terror attack
बाकू/नवी दिल्ली : अझरबैजानमध्ये झालेल्या आर्थिक सहकार्य संघटना (ECO) शिखर परिषदेच्या मंचावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर जोरदार टीका केली.
त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला "दुर्दैवी" म्हटले आणि भारतावर या घटनेचा वापर करून "अकारण आणि बेजबाबदार शत्रुत्व" दाखवून प्रादेशिक शांतता अस्थिर केल्याचा आरोप केला.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरीफ म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमधील दुर्दैवी घटनेनंतर भारताने जे शत्रुत्व दाखवले ते पूर्णपणे अकारण आणि बेजबाबदार होते. त्याचा उद्देश प्रादेशिक शांतता भंग करणे हाच होता.”
ते पुढे म्हणाले की, भारताकडून जम्मू आणि काश्मीरमधील निरपराध नागरिकांवर "क्रूर कृत्ये" केली जात आहेत, याविरोधात पाकिस्तान आवाज उठवत राहील.
काश्मीरसह शरीफ यांनी गाझा आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचाही उल्लेख केला. इस्रायलने जून महिन्यात इराणच्या अणु कार्यक्रमाविरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले होते, ज्यामध्ये 12 दिवस चाललेल्या संघर्षात 600 हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. या कारवाईवरही पाकिस्तानने तीव्र निषेध नोंदवला.
"पाकिस्तान गाझा, काश्मीर किंवा इराण – कुठेही निरपराध नागरिकांवर होणाऱ्या क्रूर अत्याचारांच्या विरोधात ठाम उभा आहे," असे शरीफ यांनी स्पष्ट केले.
भारताने याआधीच TRF चा पाकिस्तानशी असलेला संबंध उघड केला असून, अशा घटनांमुळे भारताची सुरक्षा यंत्रणा दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणारच असल्याचे संकेत दिले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतात अनेक स्तरांवर पाकिस्तानविरोधात कठोर धोरणाची मागणी होत आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील बैसरण खोऱ्यात एक मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 25 पर्यटक आणि एका स्थानिक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या सहयोगी 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) ने घेतली होती.
या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार हवाई हल्ले केले.
भारताच्या या कारवाईत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्यांची मालिकाही सुरु झाली होती, ज्याला भारताने प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.