

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानला भारताशी चर्चेद्वारे काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवायचे आहेत, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुधवारी सांगितले. 'काश्मीर एकता दिना'निमित्त मुझफ्फराबाद येथे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना शरीफ बोलत होते. काश्मिरींना पाठिंबा दर्शविण्यासाठी पाकिस्तान दरवर्षी हा दिवस साजरा करतो.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सांगितले की, काश्मीरसह सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवले जावेत, अशी आमची इच्छा आहे. काश्मिरींना त्यांचा आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत पाकिस्तान त्यांना नैतिक, राजनैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहील, असे शरीफ म्हणाले. भारतावर शस्त्रास्त्रे जमा करण्याचा आरोप करत शरीफ म्हणाले की, शस्त्रे जमा केल्याने शांतता येणार नाही किंवा प्रदेशातील लोकांचे भवितव्य बदलणार नाही. भारताने शहाणपणा दाखवला पाहिजे, कारण, प्रगतीसाठी आणि पुढे जाण्याचा शांतता हाच एकमेव मार्ग आहे.
५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम ३७० रद्द केले आणि तत्कालीन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. कलम ३७० रद्द करण्याच्या संदर्भात शरीफ म्हणाले, भारताने ५ ऑगस्ट २०१९ च्या मानसिकतेतून बाहेर पडावे. संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि चर्चा सुरू करावी.
१९९९ च्या लाहोर घोषणेत आधीच नमूद केल्याप्रमाणे, पाकिस्तान आणि भारतासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे, असे पंतप्रधान शरीफ म्हणाले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाकिस्तान भेटीदरम्यान यावर सहमती झाली होती.