पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा जिल्ह्यातील कुर्रममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. कुर्रमच्या ओचट भागात दहशतवाद्यांनी अनेक प्रवासी वाहनांवर गोळीबार केला असून, आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. पोलीस आणि लष्कराने घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा केला असून मदतकार्य सुरू आहे.
कुर्रम पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्यात पाराचिनारहून पेशावरकडे जाणाऱ्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. कुर्रम जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विविध जमाती आणि गटांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षांमध्ये डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पाकिस्तानची वृत्तसंस्था डॉनने दिलेल्या माहितीनुसार, तहसील मुख्यालय रुग्णालय अलिझाईचे अधिकारी डॉ.घायोर हुसैन यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे. तर पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. दुसरीकडे, पीपीपीने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, निरपराध प्रवाशांवर हल्ला करणे हे भ्याड आणि अमानवी कृत्य आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी पक्षाने मागणी केली आहे.
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागात जमिनीच्या वादावरून शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे. या घटनेची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रवासी वाहनांचे दोन ताफे होते. एक पेशावरहून पाराचिनार आणि दुसरा पाराचिनारहून पेशावरला प्रवासी घेऊन जात होता. तेव्हा सशस्त्र लोकांनी या वाहनांवर गोळीबार केला.