

Pakistan petrol price reduction 2026: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळं कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. यामुळे अख्ख्या जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. भारताने देखील दरवाढीबाबत आस्ते कदम भूमिका घेत हळूहळू सामान्यांच्या खिशाला भोकं पाडायला सुरूवात केली आहे.
मात्र आश्चर्याची बाब म्हणजे भारताचा सख्खा शेजारी अन् पक्का वैरी पाकिस्तानने उलटा गेम केला. त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याऐवजी स्वस्त केले. शुक्रवारी पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर ६ रूपये कपात केली आहे. तर हाय स्पीड डिझेलच्या प्रती लीटर किंमतीत ६.८० पैशांची कपात केली आहे.
पाकिस्तान सरकारच्या नव्या नोटिफेकशननंतर पेट्रोलची किंमत ही ४०३.७८ रूपये प्रती लीटर आणि हाय स्पीड डिझेलची किंमत ४०२.७८ रूपये प्रती लीटर झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीमधील कपात २३ मे रात्रीपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने सलग दुसऱ्या आठवड्यात पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात पेट्रोल डिझेलच्या दरात ५ रूपये कपात करण्यात आली होती.
पेट्रोलचा जास्तीजास्त वापर हा खासगी वाहने, छोटी वाहने आणि रिक्षासाठी केला जात होता. त्यामुळे त्याचा थेट प्रभाव हा मध्यमवर्गीयांच्या बजेटवर पडत आहे. हाय स्पीड डिझेलचा वापर विशेषकरून ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील मोठ्या वाहनांसाठी केला जातो.
आता जरी पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी गेल्या काही काळात पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. ज्यावेळी इराण इस्त्रायल युद्ध सुरू झालं त्यावेळी ६ मार्च रोजी सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत तब्बल ५५ रूपयांची वाठ केली होती. त्यानंतर २ एप्रिल रोजी पुन्हा दरवाढ करण्यात आली.