

IndiGo flight Pakistan denial |
दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने भारताच्या इंडिगो विमानाला हवामानातील धोकादायक परिस्थितीत मदत करण्यास नकार दिला. बुधवारी संध्याकाळी दिल्लीतून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला अचानक गारपिटीचा सामना करावा लागला. त्यावेळी पायलटने लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडे थोडा वेळ पाकिस्तानी हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती, मात्र ही विनंती पाकिस्तानकडून नाकारण्यात आली.
भारतीय विमान अमृतसरच्या आकाशात होते, तेव्हा अचानक हवामानात बदल झाला. यानंतर पायलटने लाहोरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधून, थोडा वेळ पाकिस्तानी आकाशातून मार्गक्रमण करण्याची विनंती केली. मात्र, माणुसकी हरवलेला शेजारी पाकिस्तानकडून ही मागणी नाकारली. त्यामुळे पायलटने विमानाचे मूळ मार्गानेच उड्डाण सुरू ठेवले.
या विमानात २२७ प्रवासी होते. हवेतच गारपिटीचा जबरदस्त मारा झाल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. पायलटने तात्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर केली. विमान सायंकाळी ६.३० वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप बाहेर पडले. मात्र या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.
या विमानात तृणमूल काँग्रेसचे डेरिक ओ ब्रायन, नदिमुल हक, सागरिका घोष, मानस भुइय्या आणि ममता ठाकूर हे पाच नेतेही प्रवास करत होते. त्यांनी पायलटचे आभार मानले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक मारले गेल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. भारतीय हवाई हद्देतून पाकिस्तानी विमानांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.