Pahalgam Terror Attack |
नवी दिल्ली, इस्लामाबाद : काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा भारत भयंकर सूड घेणार या भीतीपोटीच पाकिस्तानची गाळण उडाली आहे. पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानी लष्करात दुफळी माजली असून अडीचशे लष्करी अधिकार्यांसह 4500 सैनिकांनी राजीनामे दिले असल्याचे वृत्त आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर गायब झाले आहेत. अनेक लष्करी अधिकार्यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर रेटा लावला असल्याचे कळते.
पाकिस्तानवर भारत हल्ला करणार या भीतीने पाकमधील अनेक राजकीय नेते, उद्योगपती, बड्या लष्करी अधिकार्यांनी आपल्या कुटुंबीयांना परदेशात आश्रयाला पाठवल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कार्यशैलीबद्दलही प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सैन्यात स्पष्टपणे दोन गट पडले असून मुनीर यांच्यामुळे पाकची अवस्था 1971 सारखी झाल्याचा आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पाकचे मंत्री, नेते युद्धखोरीची भाषा करत असले तरी भारताविरोधात आपण लढू शकणार नाही, याचीही त्यांना पूर्णपणे खात्री असल्याचेही संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या आठवड्यात पहलगामच्या बैसरन व्हॅली या पर्यटनस्थळावर हल्ला करून दोन दहशतवाद्यांनी 27 पर्यटकांची नृशंस हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याचा पण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जाहीरपणे दहशतवादी आणि त्यांना मदत करणार्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देऊ. ते पाताळात लपले असले तरी त्यांना शोधून काढू, असा सज्जड इशारा दिला आहे. सिंधू पाणी वाटप करारही भारताने स्थगित केल्याची घोषणा केल्यामुळे पाकच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाकिस्तानचे राजकीय नेते, मंत्री भारताला अणुबॉम्बची धमकी देत असले तरी ती किती पोकळ आहे, याचीही त्यांना जाणीव आहे, असेही संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
पाकिस्तानी सैन्य दलात सध्या दोन गट पडले आहेत. जनरल मुनीर यांनी स्वत:च्या फायद्याकरिता सैन्य दलाचा वापर केल्याचा आरोप एका गटाकडून होत आहे. वरिष्ठ लष्करी अधिकार्यांच्या एका गटाने पत्र लिहून मुनीर यांच्यावर अनेक आक्षेप घेतले आहेत. मुनीर यांच्यामुळे पाकची अवस्था सध्या 1971 सारखी झाली आहे. ते पदावर कायम राहिले तर 1971 ची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे 1971 च्या युद्धात भारताने पाकचे दोन तुकडे करून बांगला देशची निर्मिती केली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेली भूमिका बघता असीम मुनीर यांची अवस्थाही तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि याह्या खान यांच्यासारखीच होणार, अशीही चर्चा आहे. अयुब खान यांना पदच्युत करून याह्या खान यांनी सत्ता हाती घेतली. देशात मार्शल लॉ लागू केला. पण 1971 मध्ये भारताकडून दारुण पराभव आणि पाकचे दोन तुकडे झाल्यानंतर याह्या खान यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही नवाज शरीफ यांची सत्ता उलथवत सूत्रे आपल्या हाती घेतली. पण नंतर त्यांना पाकमधून परागंदा व्हावे लागले. आता मुनीर यांचीही अशीच अवस्था होणार, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, सुमारे 4500 सैनिक आणि 250 अधिकार्यांनी राजीनामे दिले असून अनेक राजकीय नेते, उद्योगपती, सैन्य अधिकार्यांनी आपल्या कुटुंबीयांना आश्रयासाठी परदेशात पाठवल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.