

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Attack on Afghanistan | पाकिस्तानने मंगळवारी रात्री अफगानिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यात हवाई हल्ला केला. यामध्ये महिला आणि मुलांसह ४६ जण ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काल रात्री झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लमनसह सात गावांना लक्ष्य केले होते. हा भ्याड हल्ला असल्याचे म्हणत तालिबानने सूडाची शपथ घेतली आहे.
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हा बॉम्बहल्ला केला, ज्यात बर्मलमधील मुर्ग बाजार गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हवाई हल्ल्यांमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर या भागातील तणाव आणखी वाढला आहे. प्रभावित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बर्मलवर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर बदला घेण्याची शपथ घेतली आहे. तालिबानने एका निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तानला आपली जमीन आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या हल्ल्याचा निषेध करताना तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केलेल्या लक्ष्यांमध्ये वझिरीस्तानचे निर्वासितही होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या हवाई हल्ल्याला अधिकृतपणे दुजोरा दिला नसला तरी पाकिस्तानी लष्कराच्या सांगितले की, हे हवाई हल्ले सीमेजवळील तालिबानच्या ठिकाणांना लक्ष्य करून करण्यात आले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान ही घटना समोर आली आहे. पाकिस्तानी तालिबान किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये हल्ले वाढवले आहेत. तालिबान या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तालिबान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावरजामी यांनी पाकिस्तानच्या दाव्याचे खंडन केले आहे.