

Taliban Pak army Clashes
काबूल : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून तालिबानी सैन्याने सीमेवर पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध सशस्त्र बदला सुरू केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमा तणाव अचानक वाढला आहे. शनिवारी रात्री उशिरा ड्युरांड रेषेवर दोन्ही बाजूंच्या सैन्यात जोरदार गोळीबार झाला. तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण फौजांनी कुनार आणि हेलमंद या संवेदनशील प्रांतांसह पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, शनिवारी रात्री सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या चकमकीत ५८ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. या चकमकींमध्ये तालिबान सैन्याचेही ९ सदस्य मारले गेले आणि १६ जण जखमी झाले.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "ड्युरांड रेषेवरील कुनार आणि हेलमंद प्रांतांमध्ये तालिबान फौजांनी पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्या आहेत." या सीमा संघर्षात १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. बहरामचा जिल्ह्यातील शाकिज, बीबी जानी आणि सालेहान या भागांमध्ये तसेच पक्तियाच्या आर्यूब जाजी जिल्ह्यातही मोठा गोळीवार झाला.
पाकच्या हवाई हल्ल्याला उत्तर
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला अकारण हल्ला असे संबोधून, त्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत असल्याचे सांगितले. दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खोवराझमी यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. पाकिस्तानने अफगाण हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे हे प्रतिउत्तर म्हणून केले गेले आहे, असे त्यांनी सांगितले. मध्यरात्रीपर्यंत ही चकमक सुरू होती. "जर विरोधी बाजूने पुन्हा अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले, तर आमचे सशस्त्र दल संरक्षणासाठी सज्ज आहेत आणि ते कठोर प्रत्युत्तर देतील," असा इशारा खोवराझमी यांनी दिला.
पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी काबूलजवळ हवाई हल्ला केल्यानंतर हा मोठा संघर्ष झाला आहे. अफगाणिस्तानच्या '२० १ खालिद बिन वालिद आर्मी कॉर्प्स'ने याच हल्ल्याच्या प्रतिउत्तरार्थ पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला होता. यादरम्यान, कतारने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.