

Stone Hurling at Pakistan High Commission in London
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लंडनमधील पाकिस्तान उच्चायोग कार्यालयावर दगडफेड झाली आहे.
उच्चायोग इमारतीच्या खिडक्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भारतीय मूळाच्या एकाला अटक करण्यात आली आहे. लंडनमधील पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
हा प्रकार पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडला आहे. या घटनेवरून लंडनमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी समुदायाकडून निदर्शने करण्यात आली आहेत.
मेट्रोपोलिटन पोलिसांच्या मते, 41 वर्षीय अंकित लव्ह याला रविवारी अटक करण्यात आली आणि त्याच्यावर criminal damage चा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की रविवारी पहाटे, उच्चायोगातील खिडक्या फोडल्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी अंकित लव्ह याला अटक केली आहे. तो 41 वर्षांचा आहे. रविवारी 27 एप्रिल रोजी त्याच्यावर गुन्हेगारी नुकसानीचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ही घटना रविवारी 27 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 5 वाजता लॉन्ड्स स्क्वेअर, केन्सिंग्टन आणि चेल्सी येथील पाकिस्तानी उच्चायोगाजवळ घडली."
घटनेच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी भारतीय समुदायाच्या संघटनांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात निदर्शने आयोजित केली होती.
प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी निदर्शकांनी, काही राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मदतीने, मोठ्या आवाजाचे स्पीकर्स वापरून भारतीय निदर्शकांची घोषवाक्ये दडपण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी एका पाकिस्तानी मुत्सद्याने उच्चायोगाच्या बाल्कनीवरून भारतीय निदर्शकांकडे गळा चिरण्याचा धमकीसदृश्य इशारा दिला होता तो कॅमेऱ्यात कैद झाला होता.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लंडन, मँचेस्टर आणि बेलफास्टमध्ये भारतीय समुदायातर्फे श्रद्धांजली सभांचे आयोजन केले होते.
रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायोगासमोर मोठ्या प्रमाणावर निदर्शने आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानी समुदायाच्यावतीने सुरू असलेल्या लहान निदर्शनांना उत्तर देण्यासाठी या निदर्शनांचे आयोजन केले होते.
तेथील पाकिस्तानी समुदायाने पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात हा भारतीय प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी सोशल मीडियावर लिहिले की, “यूकेचे परराष्ट्र सचिव डेविड लॅमी यांच्याशी चर्चा केली. पहलगाम येथील सीमापार दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा झाली. दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरन्सचे महत्त्व अधोरेखित केले.”