

इस्लामाबाद : ‘भारतीय हवाई दलाने बहावलपूरमध्ये केलेल्या अचूक हल्ल्यात ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाला आहे,’ अशी खळबळजनक कबुली ‘जैश’चाच कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने दिली आहे. या कबुलीजबाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे भारताच्या दाव्यांना मोठे बळ मिळाले आहे. आता या पुराव्याच्या आधारे दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीयस्तरावर आणि विशेषतः फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) समोर उघडे पाडण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या व्हिडीओमध्ये, ‘जैश’ कमांडर मसूद इलियास काश्मिरी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्टपणे म्हणतो की, 7 मे रोजी बहावलपूरमध्ये भारतीय हवाईदलाच्या अचूक स्ट्राईकमध्ये ‘जैश’प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले आणि ते मारले गेले. एकीकडे ‘जैश’चा कमांडर हे सत्य स्वीकारत असताना, दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराची माध्यम शाखा (आयएसपीआर) मात्र हा हल्ला निष्पाप नागरिकांवर झाल्याचा कांगावा करत होती. या कबुलीमुळे पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
या कबुलीजबाबाने भारताच्या त्या गुप्तचर माहितीला दुजोरा दिला आहे, ज्यामध्ये बहावलपूर आजही ‘जैश-ए-मोहम्मद’चा मुख्य अड्डा असल्याचे म्हटले होते. पाकिस्तान मात्र ‘एफएटीएफ’ आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर हा दावा सातत्याने फेटाळत आला आहे.
मसूद इलियास काश्मिरीच्या या कबुलीजबाबाचा व्हिडीओ भारत आता आंतरराष्ट्रीय मंच आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) समोर सादर करू शकतो. यामुळे पाकिस्तानची संपूर्ण पोलखोल होईल. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि तो आपल्या भूमीचा वापर भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी करू देतो, हे भारत या व्हिडीओद्वारे सिद्ध करू शकेल. या पुराव्यामुळे पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी आणि त्यांचे म्होरके सक्रिय असून, त्यांना पाकिस्तानी यंत्रणांचे संरक्षण मिळत आहे, हे पाण्यासारखे स्पष्ट झाले आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, मसूद अझहरच्या कुटुंबाच्या मृत्यूनंतर ‘जैश-ए-मोहम्मद’मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ दहशतवादी लाँचपॅडपर्यंत मर्यादित नव्हते, तर थेट दहशतवादाच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्यासाठी आखले होते. या कारवाईदरम्यान भारतीय हवाईदलाने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक विशेष टेहळणी विमान (अवॅक्स) पाडले होते. तसेच, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ले केले होते.
लष्करी तज्ज्ञांच्या मते, मसूद इलियास काश्मिरीच्या या विधानामुळे भारताच्या त्या दाव्याला आणखी पुष्टी मिळाली आहे, ज्यात भारत सातत्याने सांगत आला आहे की, पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्वर्ग बनलेला आहे. या कबुलीमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी नाचक्की झाली असून, भारताला एक मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे.