

Nobel Literature 2025 : जगातील सर्वोच्च साहित्य पुरस्कारांपैकी एक नोबेल साहित्य पुरस्कार २०२५ चा विजेता आज (दि. ९ ऑक्टाेबर) जाहीर झाला. यंदा नोबेल पुरस्काराच्या शर्यतीमध्ये अनेक लेखक होते;पण हंगेरीचे लेखक लास्झ्लो क्रास्झ्नाहोर्काई यांच्या उत्कृष्ट साहित्यावर नाेबेलची माेहाेर उमटली. क्रास्झ्नाहोर्काई त्यांचे लेखन सर्वनाशाच्या दहशतीच्या काळात, कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते, अशा शब्दांमध्ये स्टॉकहोम येथील स्वीडिश अकॅडमीच्या नोबेल समितीने त्यांचा साहित्याचा गाैरव केला.
लास्लो क्रास्नाहोर्काई यांचा जन्म १९५४ मध्ये हंगेरीच्या ग्युला येथे झाला. १९८५ मध्ये लिहिलेल्या त्यांच्या पहिल्या कादंबरी सातांतांगोमध्ये त्यांनी सामूहिक शेतावरील (collective farm) अत्यंत गरीब अणिउद्ध्वस्त ग्रामीण समुदायाचे वास्तववादी चित्रण केले होते. या कादंबरीला जवळजवळ तीन दशकांनंतर २०१३ मध्ये इंग्रजीमध्ये सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार मिळाला. मानवी अनुभवातील दीर्घ आणि प्रवाही वाक्यरचना असे क्रास्नाहोर्काई यांचे लिखाण ओळखले जाते. सातांतांगो या कांदबरीवर तब्बल सात तासांचh चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच त्यांची कारकीर्द भाषेइतकीच प्रवासानेही घडवली आहे. त्यांनी प्रथम १९८७ मध्ये कम्युनिस्ट हंगेरी सोडले. फेलोशिपसाठी जर्मनीतील पश्चिम बर्लिनमध्ये एक वर्ष व्यतित केले. यानंतर पूर्व आशिया विशेषतः मंगोलिया आणि चीनमध्येही त्यांनी वास्तव्य केले. विनाशकारी कथाकथनाच्या पलीकडे जात क्रास्झ्नाहोर्काई यांनी पूर्व आशियातील प्रवासातून प्रेरित होऊन आपल्या साहित्यिक दृष्टिकोनाचा विस्तार केला. वॉर अँड वॉरसाठी त्यांनी संपूर्ण युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास केला. ७१ वर्षीय क्रास्झ्नाहोर्काई यांना यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे २०१५ मध्ये मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे क्रास्नाहोर्काई पहिले हंगेरियन लेखक हाेते. बुकरच्या परीक्षकांनी त्यांच्या 'विलक्षण लांबीच्या आणि अविश्वसनीय सीमांपर्यंत पोहोचणाऱ्या असामान्य वाक्यांचे' कौतुक केले होते. 'हे वाक्ये कधी गंभीर, कधी वेड्यासारखे, कधी उपहासात्मक तर कधी निराशाजनक असा सूर घेत आपली विक्षिप्त वाटचाल करतात,' असे मत परीक्षकांनी मांडले होते.
क्रास्झ्नाहोर्काई यांचे इंग्रजी भाषांतरकार, कवी जॉर्ज सिरटेस (George Szirtes) यांनी 'एएफपी' (AFP) वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांना 'एक संमोहक लेखक' असे संबोधले आहे. 'त्यांचे लेखन तुम्हाला त्यांच्या जगात घेवून जाते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
यंदाचा नोबेल साहित्य पुरस्कारामध्ये भारतीय लेखक अमिताभ घोष यांचेही नाव चर्चेत होते. अमिताभ घोष यांना हा सन्मान मिळाला असता तर रवींद्रनाथ टागोर (१९१३) यांच्यानंतर ते नोबेल पुरस्कार जिंकणारे दुसरे भारतीय ठरले असते. जगभरातील वाचनप्रेमींना दरवर्षी जपानी लेखक हारुकी मुराकामी बाजी मारतील अशी उत्सुकता असते. यावर्षीही मुराकामी याचेही नाव चर्चेत होते. ऑस्ट्रेलियन लेखक जेराल्ड मुर्नन, मेक्सिकन लेखिका क्रिस्टिना रिवेरा गार्झा रोमानियाचे मिर्सिया कार्तारेस्कु , अमेरिकेचे थॉमस पिंचॉन, चीनच्या कॅन झुए यांचीही नावे चर्चेत होती.
फ्रेंच कवी सुली प्रुधोम यांना १९०१ मध्ये पहिले नोबेल साहित्य पारितोषिक मिळाले होते.
स्वीडनच्या सेल्मा लागेरलॉफ (Selma Lagerlöf) या १९०९ मध्ये हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
फ्रान्सने साहित्यातील सर्वाधिक (१६) नोबेल विजेते लेखक दिले आहेत.
१२४ वर्षांच्या इतिहासात केवळ १८ महिलांना हा सन्मान मिळाला आहे.
लिओ टॉल्स्टॉय, व्हर्जिनिया वूल्फ , जेम्स जॉयस यांसारख्या काही महान साहित्यिकांना कधीही नोबेल सन्मान मिळाला नाही.
जीन-पॉल सार्त्र आणि बोरिस पास्तरनाक यांसारख्या काही साहित्यिकांनी तो नाकारला किंवा त्यांना तो नाकारण्यास भाग पाडले गेले.
२०२५ चा पहिला नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. वैद्यकशास्त्रातील पुरस्कार मेरी ई ब्रुन्को, फ्रेड रॅम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना 'बाह्य रोगप्रतिकारशक्ती सहनशीलता' (peripheral immune tolerance) संबंधीच्या शोधांसाठी देण्यात आला. मंगळवारी (दि. ७) भौतिकशास्त्रातील पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना त्यांच्या 'सबअॅटॉमिक क्वांटम टनेलिंग' या अद्भुत जगावरील संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमू किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना ‘मेटल-ऑरगॅनिक फ्रेमवर्कच्या विकासासाठी’ जाहीर झाला आहे. आता १० ऑक्टोबरला नोबेल शांतता पुरस्कार आणि सोमवार, १३ ऑक्टोबरला अर्थशास्त्र पुरस्काराची घोषणा होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण १० डिसेंबर रोजी, नोबेल पुरस्कारांचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात केले जाईल.