

New Year celebrations
ऑकलंड: भारतात नववर्षाच्या स्वागतासाठी सारे जण आतुरलेले आहेत. कालचक्रात नववर्षाचे पान उलटत असताना दरवर्षीप्रमाणे न्यूझीलंडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. ऑकलंडमधील प्रसिद्ध 'स्काय टॉवर'वर झालेल्या भव्य आणि चित्तवेधक आतषबाजीने अवघे आकाश उजळून निघाले आहे.
ऑकलंड शहराच्या वैभवात भर घालणारा 'स्काय टॉवर' याच्या 'थर्टी फस्ट'चे सेलिब्रेशनचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. वर्षातील पहिले मोठे 'काऊंटडाऊन' पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती. रात्रीचे बारा वाजताच स्काय टॉवरवरून झालेल्या रोषणाईने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
५ मिनिटांत ३,५०० फटाक्यांची आतषबाजी सुमारे २४० मीटर (७८७ फूट) उंच असलेल्या या टॉवरच्या विविध मजल्यांवरून तब्बल ३,५०० शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सलग पाच मिनिटे चाललेल्या या सोहळ्याने आसमंत न्हाऊन निघाला. दरम्यान, खराब हवामान आणि गडगडाटासह पावसाच्या अंदाजामुळे न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील (North Island) काही स्थानिक कार्यक्रम रद्द करावे लागले. मात्र, मुख्य सोहळ्यातील उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले.
२०२६ ची सुरुवात किरिबाटीतील किरितिमाती बेटावर झाली. नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करणारा हा जगातील पहिला देश आहे. किरिबाती, ज्याला किरिबास असेही म्हणतात, हा अनेक प्रवाळ पर्वतांनी बनलेला एक बेट समूह आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ४,००० किलोमीटर लांब आहे. येथे नवीन वर्ष भारतापेक्षा ८ तास ३० मिनिटे आधी सुरू होते.