Benjamin Netanyahu | इराणला कदापि अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही : नेतान्याहू

गरज पडल्यास पुन्हा हल्ला करू, संघर्ष अद्याप संपलेला नाही
Benjamin Netanyahu |
Benjamin Netanyahu | इराणला कदापि अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही : नेतान्याहू
Published on
Updated on

जेरुसलेम; वृत्तसंस्था : इराणला कोणत्याही परिस्थितीत अणुबॉम्ब तयार करू देणार नाही आणि गरज पडल्यास पुन्हा लष्करी कारवाई करण्यास इस्रायल मागे-पुढे पाहणार नाही, असा कठोर इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला. इराणविरुद्धचा संघर्ष अद्याप संपलेला नसून पुढील काही दिवसांत नव्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायली हवाई दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना नेतान्याहू म्हणाले की, इस्रायलने वेळेवर कारवाई केली नसती, तर इराणकडे आतापर्यंत अण्वस्त्रे तयार झाली असती. अणू करार झाला किंवा नाही, इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, ही इस्रायलची भूमिका कायम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल इराणविरुद्ध आणखी एका लष्करी कारवाईची तयारी करत असून त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. अमेरिका-इराणमधील लष्करी चकमकी पुढील काही दिवस सुरू राहू शकतात, अशी शक्यता इस्रायली अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

मोजतबा आज समोर येणार?

दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई शनिवारी प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसण्याची शक्यता आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ते कोम शहरातील हजरत मासूमेह दर्ग्यात आयोजित अयातुल्ला अली खामेनी यांच्या शोकसभेला उपस्थित राहणार आहेत.

अमेरिका-इराणमध्ये हल्ले-प्रतिहल्ले

इराणच्या एका अधिकाऱ्याने अमेरिकेने बुशेहर अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले असले, तरी अमेरिकेकडून या दाव्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. संबंधित देशांनी आपली हवाई संरक्षण व्यवस्था वापरून बहुतांश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. इराणने अमेरिकेवर उत्तर भागातील चीन आणि रशियाशी व्यापारमार्ग जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे पुलावर क्रूझ क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तेहरानने या कारवाईला 'युद्धगुन्हा' असे संबोधत तीव्र निषेध नोंदविला आहे. अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्यापारी जहाजांची हालचाल मोठ्या प्रमाणात मंदावली असून त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे एक टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ब्रिटनच्या मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स संस्थेने होर्मुझ सामुद्रधुनीतील धोक्याची पातळी सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे.

एका रात्रीत एक कोटी बॅरेल कच्चे तेल हलवले

अमेरिकेच्या नौदलाकडून नाकेबंदीच्या भीतीने इराणने एका रात्रीत सुमारे एक कोटी बॅरेल कच्चे तेल आणि इंधनसाठा सुरक्षित ठिकाणी हलवल्याचा दावा अल जझीराने केला आहे. यामुळे संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

इराणचा इस्रायलला इशारा

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहम्मद बाघेर झोलघद्र यांनी इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला झाल्यास इस्रायलला त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. इराणवरील हल्ला सहन केला जाणार नाही आणि इस्रायललाही त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news