Israel Elections | नेतान्याहू बहूमतापासून दूरच

इस्रायल निवडणूक; विरोधक आणि अरब पक्षांकडे मिळून ६७ जागा
Israel Elections |
Israel Elections | नेतान्याहू बहूमतापासून दूरच
Published on: 
Updated on: 

तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलच्या २०२६ मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारसरणीच्या गटाने ५३ जागांसह आघाडी घेतली आहे. तथापि, ज्युंच्या पाठिंब्यानंतरही नेतान्याहू बहूमतापासून दूरच राहिले आहेत. तर माजी लष्कर प्रमुख गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाला ४८ जागा मिळू शकतात. तर अरब पक्षांना १९ जागा मिळण्याची शक्यता असल्याने विरोधकांकडे मिळून ६७ जागा झाल्या आहेत.

२८ ऑक्टोबर रोजी जवळपास सर्व मतमोजणी पूर्ण झाली आहे. मात्र, १२० सदस्यांच्या इस्रायली संसदेत (नेसेट) सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक ६१ जागांचे बहुमत कोणत्याही एका पक्षाला, गटाला मिळालेले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी वाटाघाटी लांबण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

अरब पक्षांचे यश

इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या प्राथमिक निकालांनुसार, अरब नेतृत्वाखालील जॉइंट लिस्ट आणि रा'म या पक्षांच्या एकत्रित जागा १९ वर आल्या आहेत. रिझर्व्हिस्टस्‌ पक्षाला २.७ टक्के, पीपल ऑफ इस्रायल पक्षाला १.६ टक्के आणि चारेदी पब्लिक पक्षाला ०.२ टक्के मते मिळाली आहेत. हे तिन्ही पक्ष ३.२५ टक्क्यांच्या निवडणूक पात्रता मर्यादेखाली आहेत.

नेतान्याहूंचा उजव्या सरकारचा आग्रह

मतदानानंतर समर्थकांना संबोधित करताना नेतान्याहू यांनी उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी झायोनिस्ट जनतेमध्ये निर्णायक बहुमत मिळवल्याचा दावा केला. इस्रायलमध्ये मजबूत, राष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. लिकूड हा सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले; मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले ६१ जागांचे बहुमत अद्याप मिळालेले नाही. अरब पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यास नेतान्याहू यांनी विरोध दर्शवला आहे. इस्रायलच्या सुरक्षेसाठी अशा पक्षांवर अवलंबून राहता कामा नये, असे ते म्हणाले. इराणचा धोका संपवण्याबाबतही त्यांनी भाष्य केले.

आयझेनकोट यांच्याकडून बदलाचा दावा

विरोधी गटाचे नेते गादी आयझेनकोट यांनी जनतेला बदल हवा असल्याचे सांगितले. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेतान्याहू यांनी आपल्या अधिकारांचा वापर राजकीय वाटाघाटींवर प्रभाव टाकण्यासाठी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. इस्रायलची सुरक्षा राजकीय फायद्यासाठी वापरू नये, असे ते म्हणाले.

विक्रमी मतदान; शेअर बाजारात घसरण

या निवडणुकीत ७७.७ टक्के मतदान झाले. दोन दशकांतील हे सर्वाधिक मतदान आहे. दरम्यान, तेल अवीव शेअर बाजाराचा टीए-१२५ निर्देशांक १.७ टक्क्यांनी घसरला, तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इस्रायली शेकेलचे मूल्य एक टक्क्याने कमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news