

तेल अवीव; वृत्तसंस्था : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी जिवंत असून ते सध्या एका गुप्त बंकरमध्ये लपून बसले आहेत, असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला आहे. तथापि, मोज्तबा हे त्यांच्या वडिलांप्रमाणे म्हणजेच माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासारखी सत्ता आणि नियंत्रण त्यांच्याकडे नाही, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू बोलत होते.
नेतान्याहू म्हणाले की, 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण सध्या सर्वात कमकुवत टप्प्यातून जात आहे. सत्ताधारी व्यवस्थेमध्ये अंतर्गत मतभेद वाढले असून वेगवेगळ्या गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. काही गट संघर्ष कायम ठेवू इच्छितात, तर काहींना भीती आहे की त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडेल आणि जनता रस्त्यावर उतरेल. इराणी सत्तेला सर्वात मोठी भीती जनतेची आहे.
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अली खामेनी यांच्या कथित ठिकाणावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अली खामेनी, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. त्याच हल्ल्यात मोज्तबा गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. त्यांच्या पायावर तीन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना कृत्रिम पाय बसवावा लागू शकतो, अशीही चर्चा आहे. याशिवाय, त्यांच्या हातावरही शस्त्रक्रिया केली असून चेहरा आणि ओठ गंभीररीत्या भाजल्यामुळे त्यांना बोलण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
नेतान्याहू म्हणाले की, सोशल मीडियावर बॉट फार्म आणि बनावट खात्यांद्वारे इस्रायलविरोधी प्रचार केला जात आहे. पुढील 10 वर्षांत इस्रायल, अमेरिकेकडून मिळणारी लष्करी आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्याचा विचार करत आहे. भविष्यात इस्रायलला मदत घेणारा देश नव्हे तर अमेरिकेचा समान भागीदार म्हणून उभे राहायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेतान्याहू म्हणाले, अलीकडील कारवाईत इराणमधील पेट्रोकेमिकल प्रकल्प, स्टील कारखाने आणि क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था आणि लष्करी क्षमता दोन्हीला मोठा फटका बसला आहे. इराण कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम हिजबुल्लाह, हमास आणि हूती बंडखोरांसारख्या संघटनांवरही होईल. युद्धापूर्वी हिजबुल्लाहकडे सुमारे दीड लाख क्षेपणास्त्रे आणि रॉकेटस् होती, त्यापैकी 90 टक्क्यांहून अधिक इस्रायलने नष्ट केली आहेत.
नेतान्याहू म्हणाले की, इराणकडे अजूनही समृद्ध युरेनियम, सक्रिय अणुकेंद्रे आणि बॅलेस्टिक मिसाईल कार्यक्रम अस्तित्वात आहे. त्यामुळे संघर्ष अद्याप संपलेला नाही. गरज पडल्यास पुन्हा लष्करी कारवाई केली जाऊ शकते. आर्थिक निर्बंध आणि राजनैतिक दबावातून उद्दिष्ट साध्य झाले, तर युद्धाची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.