

खाद्य क्षेत्रातील दिग्गज स्विस कंपनी नेस्लेने आगामी दोन वर्षांमध्ये १६,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) फिलिप नवरातिल यांनी 'सर्वाधिक संभाव्य परतावा' देणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणातून हा निर्णय घेतला आहे.
कंपनीने गुरुवारी घोषणा केली की, आगामी दोन वर्षांत ही कर्मचारी कपात केली जाईल. कंपनीने स्पष्ट केले की, ती पुढील वर्षाच्या अखेरीस खर्च कपातीचे लक्ष्य वाढवून ३ अब्ज स्विस फ्रँक (सुमारे ३.७६ अब्ज डॉलर) करत आहे. यापूर्वी हे लक्ष्य २.५ अब्ज स्विस फ्रँक (३.१३ अब्ज डॉलर) होते.
स्वित्झर्लंड येथील या कंपनीसाठी हे वर्ष अस्थिरतेचे ठरले आहे. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये कंपनीत मोठी उलथापालथ झाली होती. कंपनीचे सीईओ लॉरेंट फ्रेक्स यांना बडतर्फ करण्यात आले होते. कंपनीतील कर्मचारी महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांच्या आरोपावरून चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. ते या पदावर रुजू होऊन केवळ केवळ एक वर्ष झाले होते. त्यानंतर फिलिप नवरातिल यांची कंपनीचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, फ्रेक्स यांना पदावरून हटवल्यानंतर लगेचच कंपनीचे अध्यक्ष पॉल बुल्के यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
नेस्लेदेखील इतर खाद्य उत्पादक कंपन्यांप्रमाणे वाढती कमोडिटी किंमत आणि टॅरिफच्या नकारात्मक परिणामांसारख्या आव्हानांचा सामना करत आहे. कंपनीने जुलैमध्ये सांगितले होते की, कॉफी आणि कोको संबंधित वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी त्यांनी उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत.
दरम्यान, नेस्लेने गुरुवारी (दि. १६) सांगितले की, ते अनेक ठिकाणी १२,००० पदे संपुष्टात आणणार आहेत. या नोकरकपातीमुळे पुढील वर्षाच्या अखेरीस वार्षिक १ अब्ज स्विस फ्रँक (१.२५ अब्ज डॉलर)ची बचत होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, कंपनी आपल्या उत्पादन आणि पुरवठा साखळीतील उत्पादकता वाढवण्याच्या प्रयत्नांअंतर्गत ४,००० नोकऱ्यांमध्ये कपात करेल.
नवे सीईओ नवरातिल यांनी एका निवेदनात म्हटले आहे, ‘जग बदलत आहे आणि नेस्लेने अधिक वेगाने बदलण्याची गरज आहे.’ नेस्लेच्या या घोषणेनंतर स्विस स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ८ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली.