

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नेपाळच्या उत्तरेकडील रसुवा व नुवाकोट जिल्ह्यांत भोटेकोशी नदीला आलेल्या अचानक भीषण पुरामागे चीनची ‘लपंडावा’ची भूमिका असल्याचे समोर येत आहे. बुधवारी उडालेला हाहाकार आणि विध्वंसाला ‘चीनने हिमतलाव फुटण्याची वेळेवर कल्पना न देणे’ हेच मुख्य कारण असल्याचा थेट आरोप नेपाळने केला आहे; तर चीनने मात्र हा आरोप फेटाळताना सध्या बचावकार्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे म्हणत सारवासारव सुरू केली आहे.
बुधवारी आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर नेपाळमधील राजकीय वर्तुळासह सोशल मीडिया व पत्रकारांत चीनच्या हेतूंबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिबेटच्या भागात हिमनदीचा तलाव फुटल्याने किंवा अतिवृष्टीमुळे हा पूर आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (वैज्ञानिक भाषेत हिमनदी सरोवर उद्रेक - ग्लेशियर लेक आऊटबर्स्ट फ्लड - जीएलओएफ). मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपग्रह यंत्रणा व पूर्वसूचना देणारे हाय टेक सेन्सर्स असूनही चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या या महापुराची वेळेवर पूर्वसूचना नेपाळ सरकारला दिली नाही, असा थेट आरोप केला जात आहे.
हा आहे आरोप
नेपाळच्या आरोपानुसार, हिमतलाव फुटण्याची कल्पना चीनला आधीच होती. चीनने भारत-नेपाळ सीमेवर उंच पर्वतीय परिसरात रिमोट सेसिंग स्टेशन उभारले आहे. तेथे ऑटोमेटेड ड्रोन व इतर गोष्टींची माहित देणारे हायटेक देखरेख नेटवर्क आहे. जलस्तर वाढल्यावर सेन्सर्स ड्रोन सिस्टीम्स व कंट्रोल रूमला अलर्ट पाठवतात. शिवाय स्थानिक वैज्ञानिक पथक या परिसरात कायम नजर ठेवून असते. तसेच
ड्रोनद्वारे हिमतलाव, नद्या व बर्फ वितळण्याच्या स्थितीचे निरीक्षण केले जाते. एवढी सगळी यंत्रणा असल्याने नेपाळमध्ये प्रलय आणणारा धोकादायक स्थितीत असल्याची माहिती आधी मिळाली नाही, असे म्हणणे चीनभोवतीचा संशय वाढवणार्या आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेनंतर शोध आणि मदत कार्य जलद करण्याचे निर्देश दिले असले तरी, नेपाळच्या जनतेत निर्माण झालेला अविश्वास व संताप सहजासहजी शांत होणारा नाही. हा महापूर केवळ एका नैसर्गिक आपत्तीपुरता मर्यादित नसून तो दोन देशांतील मुत्सद्दी संबंध आणि सीमेवरील सुरक्षेच्या अभावावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.
आता चीनचे नेपाळमधील राजदूत झांग माओमिंग आणि चिनी दूतावासाने नेपाळचे आरोप खोटे व दिशाभूल करणारे असल्याचे सांगत आपल्यावरील धूळ झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
1. तिबेटमधील केरूंग काऊंटीमध्ये सकाळी १०.१० वाजता अचानक पूर आला. चीन व नेपाळच्या वेळेत २ तास १५ मिनिटांचा फरक आहे. तिबेट सीमेवर हिमतलाव फुटला त्यावेळी नेपाळमध्ये सकाळचे ८.१५ वाजले होते. मात्र, नेपाळच्या रसुवाचे जिल्हाधिकार्यांना केरूंगच्या दिशेने पुराचे पाणी नेपाळकडे येत असल्याची माहिती ९ च्या सुमारास मिळाली आणि त्यांनी पुढे याची सूचना दिली. हिमतलावाच्या फुटण्याची माहिती चीनने तत्काळ दिली असती तर एवढी मोठी आपत्ती ओढवली नसती, असे नेपाळचे म्हणणे आहे.
2. हिमतलाव फुटल्यामुळे होणार्या संभाव्य नुकसानीची कल्पना असूनही चीनने ही माहिती दडवण्यामागे भारताला धक्का पोहोचविण्याचा चीनचा डाव असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. नेपाळमधून धावणार्या नद्या पुढे भारतात जातात. या नद्यांना आलेल्या महापुराचे पाणी पुढे भारतात जाऊन नेपाळप्रमाणेच भारतातही मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. हेच हेरून चीनने महाप्रलयाची माहिती दडवल्याचाही संशय व्यक्त होत आहे.