Hantavirus Outbreak: अटलांटिकमध्ये अडकलं ‘मृत्यूचं जहाज’? MV Hondius वर हँटाव्हायरसचा कहर; २ भारतीयांसह १४९ जण जहाजावरच

MV Hondius Hantavirus Outbreak: अटलांटिक महासागरातील MV Hondius या क्रूझ जहाजावर हँटाव्हायरसचा उद्रेक झाल्याने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जहाजावर अजूनही १४९ जण अडकले आहेत.
MV Hondius Hantavirus Outbreak
MV Hondius Hantavirus OutbreakPudhari
Published on
Updated on

MV Hondius Hantavirus Outbreak: अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या MV Hondius या लक्झरी क्रूझ जहाजावर हँटाव्हायरसचा उद्रेक झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या जहाजावर आतापर्यंत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण संक्रमित झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जहाजावर अजूनही १४९ लोक अडकलेले आहेत आणि त्यात दोन भारतीय क्रू सदस्यांचाही समावेश आहे.

केप व्हर्डेजवळ समुद्रात हे जहाज काही दिवसांपासून आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. संक्रमित प्रवाशांना उपचारासाठी बाहेर हलवण्यात आलं असलं, तरी जहाजावरील उर्वरित लोकांबाबत चिंता कायम आहे. दोन भारतीयांची प्रकृती नेमकी कशी आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नेमकं जहाजावर काय घडलं?

Oceanwide Expeditions या कंपनीच्या माहितीनुसार, परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लक्षणे दिसलेल्या आणि बाधित आढळलेल्या सर्व प्रवाशांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

हे जहाज ६ मे रोजी केप व्हर्डेमधून निघालं असून सध्या स्पेनच्या कॅनरी आयलंड्समधील टेनेरिफेकडे जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत जहाज तेथे पोहोचण्याची शक्यता आहे. कंपनीचा दावा आहे की सध्या जहाजावर कोणत्याही प्रवाशामध्ये लक्षणे दिसत नाहीत.

MV Hondius Hantavirus Outbreak
Maharashtra SSC Result 2026: दहावीचा निकाल जाहीर; वेबसाईट, SMS आणि डिजीलॉकरवर निकाल कसा पाहता येणार? A to Z माहिती

२३ देशांतील प्रवासी जहाजावर

Oceanwide Expeditions ने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे जहाजावर एकूण २३ देशांतील नागरिक आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्पेन यांसारख्या देशांतील प्रवाशांसोबत दोन भारतीय क्रू सदस्यांचाही समावेश आहे.

आरोग्य यंत्रणा, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि नेदरलँड्सची सार्वजनिक आरोग्य संस्था RIVM पुढील क्वारंटाईन आणि तपासणी प्रक्रिया ठरवत आहेत.

हँटाव्हायरस म्हणजे काय?

हँटाव्हायरस हा अत्यंत दुर्मिळ पण धोकादायक विषाणू मानला जातो. हा प्रामुख्याने उंदरांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या लघवी, लाळ किंवा विष्ठेमधून माणसांमध्ये पसरतो. काही प्रकरणांमध्ये हा विषाणू माणसामाणसांतही पसरण्याची शक्यता असते.

या जहाजावरील प्रकरणात ‘Andes Virus’ हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा हँटाव्हायरसचा असा प्रकार आहे, जो जवळच्या संपर्कातून माणसांमध्ये पसरू शकतो.

MV Hondius Hantavirus Outbreak
Pune Unauthorized Schools: पुण्यातील 45 शाळांवर कारवाईचा इशारा! पालकांनो, प्रवेश घेण्यापूर्वी ही यादी तपासा

मृत्यूंमुळे भीती वाढली

या क्रूझवरील तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर परिस्थिती गंभीर बनली आहे. सुरुवातीला काही प्रवाशांना ताप, श्वसनास त्रास आणि इतर लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. मात्र काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आता जहाजावरील इतर प्रवाशांची आणि क्रू सदस्यांची वैद्यकीय तपासणी सुरू असून, लक्षणे नसलेल्या पण संपर्कात आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

अर्जेंटिनातून सुरू झाला प्रवास

MV Hondius हे जहाज अर्जेंटिनातून निघालं होतं. अंटार्क्टिक परिसर आणि दक्षिण अटलांटिकमधील बेटांचा प्रवास करत हे जहाज कॅनरी आयलंड्सकडे जात असताना हा प्रकार समोर आला.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली असून, जहाजावरील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांवर आरोग्य यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news