Hantavirus Outbreak: लक्झरी क्रूझवर दुर्मिळ व्हायरसमुळे चिंता वाढली; तीन प्रवाशांचा मृत्यू... जहाजाला बंदरात प्रवेशबंदी

Hantavirus Outbreak: MV Hondius या क्रूझ जहाजावर संशयित हंटाव्हायरसमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. केप व्हर्डे प्रशासनाने जहाजाला बंदरात प्रवेश नाकारला असून प्रवाशांना केबिनमध्ये ठेवण्यात आले आहे.
Hantavirus Outbreak
Hantavirus OutbreakPudhari
Published on
Updated on

MV Hondius Hantavirus Outbreak: अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या लक्झरी क्रूझ जहाजावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एम.व्ही. होंडियस या जहाजावर संशयित हंटाव्हायरस संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर केप व्हर्डे प्रशासनाने जहाजाला बंदरात थांबण्यास परवानगी नाकारली असून जहाज सध्या समुद्रातच थांबवण्यात आले आहे.

हे जहाज अर्जेंटिनातील उशुआया येथून आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील केप व्हर्डेकडे जात होते. प्रवासादरम्यान काही प्रवाशांमध्ये श्वसनविकाराची लक्षणे दिसू लागली आणि त्यातूनच परिस्थिती गंभीर झाली. 11 एप्रिल रोजी एका 70 वर्षीय डच नागरिकाचा ताप, डोकेदुखी, पोटदुखी आणि जुलाब या लक्षणांनंतर मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नीही आजारी पडली आणि दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

याच दरम्यान, एका ब्रिटिश नागरिकाला गंभीर अवस्थेत दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आले, तर 2 मे रोजी एका जर्मन प्रवाशाचा जहाजावरच मृत्यू झाला. या सर्व घटनांमुळे जहाजावरील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सध्या जहाजावर 88 प्रवासी आणि 61 कर्मचारी असून, काही जणांमध्ये अजूनही श्वसनासंबंधी लक्षणे दिसत आहेत.

Hantavirus Outbreak
Murbad Crime: ठाण्यात धक्कादायक घटना! 13 वर्षीय मुलाकडून शिक्षिकेवर धारदार शस्त्राने हल्ला; परिसरात खळबळ

या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांना त्यांच्या केबिनमध्येच ठेवण्यात आले असून कडक आरोग्य नियम लागू करण्यात आले आहेत. जहाजाला केप व्हर्डेच्या प्राया बंदरात थांबण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. आता हे जहाज कॅनरी आयलंड्सकडे वळवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

हँटाव्हायरस म्हणजे काय?

या प्रकरणात हँटाव्हायरस या संसर्गाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा विषाणू प्रामुख्याने उंदरांसारख्या प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरतो. त्यांच्या विष्ठा, मूत्र किंवा संक्रमित धुळीच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो. जगभरात या विषाणूचे विविध प्रकार आढळतात. यातील काही प्रकार युरोप-आशियात आढळतात, ज्यात मुख्यतः किडनीवर परिणाम होतो, तर अमेरिकन प्रकार अधिक घातक असून तो श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम करतो.

Hantavirus Outbreak
Raja Shivaji Box Office Day 4: ‘राजा शिवाजी’ने चौथ्या दिवशी किती कमाई केली? 'या' चित्रपटांना टाकलं मागे

तज्ज्ञांच्या मते, या विषाणूचा प्रसार अत्यंत दुर्मिळ आहे. विशेषतः दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या ‘अँडीज’ प्रकारात काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये हा संसर्ग एकमेकांमध्ये पसरू शकतो, मात्र त्यासाठी अत्यंत जवळचा संपर्क आवश्यक असतो.

दरम्यान, जहाज चालवणाऱ्या कंपनीने प्राथमिक तपासात संसर्ग जहाजावरून सुरू झाल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका प्रवाशाने दक्षिण अमेरिकेत प्रवास केल्यानंतर हा संसर्ग आणला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एकूणच, MV Hondius वरील ही घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली असून, समुद्रातील प्रवासादरम्यान आरोग्य सुरक्षेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पुढील तपास आणि वैद्यकीय अहवालांनंतरच या मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news