

Bangladesh politics Yunus resignation |
ढाका : बांगलादेशमध्ये राजकीय अडचणीत सापडल्यावर पाठिंबा मिळवण्यासाठी झगडणाऱ्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे काम करणे कठीण होत आहे, असे त्यांना वाटते. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी) चे प्रमुख एनहिद इस्लाम यांच्या हवाल्याने बीबीसी बांगला सेवेने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे वृत्त दिले.
युनूस यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला लष्करप्रमुखांविरोधात आंदोलन उभारण्यासाठीचा डाव मानले जात आहे. कारण लष्करप्रमुख निवडणुका घेण्यावर ठाम आहेत आणि निवडणुका झाल्यास युनूस यांचा बांगलादेशच्या ‘डि फॅक्टो’ पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपेल. गुरुवारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या निदर्शनांनंतर आणि त्याआधी लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांच्या कठोर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर युनूस यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. इस्लाम यांनी बीबीसी बांगलाला सांगितले की, 'आज सकाळपासून आम्हाला सरांच्या (युनुस) राजीनाम्याची बातमी ऐकायला मिळत आहे. म्हणून मी त्या विषयावर चर्चा करण्यासाठी सरांना भेटायला गेलो. सरांनी असेही सांगितले की ते याबद्दल विचार करत आहेत. त्यांना वाटते की परिस्थिती अशी आहे की ते काम करू शकत नाहीत.
आवामी लीगवर बंदी घालण्यापासून महिलांच्या सुधारणा रोखण्यापर्यंत आणि मुजीबूर रहमान यांच्या धनमंडी-३२ निवासस्थानाची तोडफोड करण्यापर्यंत इस्लामी आणि विद्यार्थी आंदोलकांनी बांगलादेशात वर्चस्व निर्माण केले. प्रत्येक प्रकरणात युनूस हे प्रत्यक्ष सहभागी नसले तरी मौन बाळगून सहभागीच होते, असा आरोप आहे. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांना ढाका सोडायला भाग पाडल्यावर मुहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाची सूत्रे घेतली होती. आता त्याच नाट्यमय पद्धतीने ते राजीनाम्याचा इशारा देत आहेत.