Mojtaba Khamenei | मोज्तबा खामेनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदी

Mojtaba Khamenei |
Mojtaba Khamenei | मोज्तबा खामेनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदी
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : इराणने आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा केली असून, अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर सुमारे आठवडाभराने त्यांचा मुलगा मोज्तबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकन आणि इस्रायली संयुक्त हल्ल्यांमध्ये अली खामेनी ठार झाल्यानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत मोठे युद्ध भडकले आहे.

रविवारी तज्ज्ञांच्या सभेने 56 वर्षीय मोज्तबा खामेनी यांची त्यांच्या वडिलांच्या उत्तराधिकारी म्हणून निवड केली. आता इराणच्या 47 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाच्या काळात देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. नव्या नेत्याला इराणमधील प्रमुख राजकीय नेते, प्रभावशाली इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि सशस्त्र दलांनी तात्काळ पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन यांनी ही नियुक्ती देशासाठी ‘स्वाभिमान आणि शक्तीच्या नव्या युगाची सुरुवात’ असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, या निर्णयामुळे राष्ट्रीय एकता अधिक मजबूत होईल.

परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही नव्या नेत्याचे अभिनंदन करत इराणच्या हितसंबंध आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा केली. सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनीही सर्वांनी नव्या नेत्याभोवती एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. मोज्तबा खामेनी यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही किंवा सार्वजनिक मतदानाला सामोरे गेलेले नाही. मात्र, ते दीर्घकाळ सर्वोच्च नेत्यांच्या अंतर्गत वर्तुळातील प्रभावशाली व्यक्ती मानले जात होते आणि शी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अनेक वर्षांपासून त्यांना अली खामेनी यांचे संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना “पुढे काय होते ते पाहू” असे म्हटले. इस्रायलनेही नव्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र मोज्तबा खामेनी यांना ‘अढळ पाठिंबा’ जाहीर केला.

“एपस्टिनच्या टोळीने निर्णय घेतला नाही”

इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीवरून अमेरिकेवर आणि पाश्चिमात्य देशांवर इराणी नेतृत्वाने जोरदार टीका केली आहे. इराणच्या असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्टसने स्पष्ट केले की नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करताना त्यांनी “एक मिनिटही विलंब केला नाही” आणि हा निर्णय पूर्णपणे इराणचा अंतर्गत विषय आहे. दरम्यान, संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर घालीबाफ यांनी सोशल मीडियावर अमेरिकेवर टीका करत म्हटले, “प्रिय इराणचे भविष्य केवळ अभिमानी इराणी राष्ट्र ठरवेल, जेफ्री एपस्टिनच्या टोळीने नाही.”

मोज्तबा खामेनी : कट्टर विचारसरणी

जन्म : 8 सप्टेंबर 1969, मशहद, इराण

वय : 56 वर्षे

मोज्तबा खामेनी हे इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर त्यांच्या वडिलांची राजकीय उंची वाढत असताना मोज्तबा इराणच्या क्रांतिकारी अभिजात वर्गातच वाढले. 1989 मध्ये अली खामेनी इराणचे सर्वोच्च नेते बनले.

मोज्तबा यांनी इराणमधील शिया इस्लामिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र मानल्या जाणार्‍या क़ोम येथील प्रसिद्ध धार्मिक शिक्षणसंस्थेत इस्लामिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.

काही दशकांपर्यंत ते इराणच्या सत्ताकेंद्रातील अत्यंत प्रभावशाली पण कमी दिसणार्‍या व्यक्तींमध्ये गणले जात होते.

इराण-इराक युद्धाच्या अखेरीस त्यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्समध्ये प्रवेश केला आणि युद्धातील काही मोहिमांमध्ये सहभाग घेतला. इराणच्या सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकार्‍यांशी त्यांचे मजबूत संबंध तयार झाले.

मोज्तबा खामेनी यांच्यावरून वारसाहक्काच्या प्रश्नावर वाद

तेहरान : इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची देशाच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे इराणमध्ये पुराणमतवादी विचारसरणीचे सातत्य कायम राहिल्याचे मानले जात असले तरी 1979 च्या इस्लामिक क्रांतीच्या तत्त्वांशी हा वारसाहक्काचा निर्णय कितपत सुसंगत आहे, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मोज्तबा खामेनी हे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस् कॉर्प्स यांच्या पसंतीचे उमेदवार होते. त्यांच्या नियुक्तीनंतर लगेचच इराण-इराक युद्धाच्या काळातील, ते 17 वर्षांचे असताना सीमारेषेवर लढत असल्याचे जुने व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले. समर्थकांच्या मते ते आपल्या वडिलांच्या धोरणांचा पुढे चालू ठेवणारे सक्षम नेतृत्व ठरू शकतात.

सुधारक गटाने युद्धजन्य परिस्थितीत सर्वोच्च नेत्याची निवड पुढे ढकलण्याची मागणी केली होती. माजी राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांनीही या निर्णयामुळे राष्ट्रीय एकतेवर परिणाम होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. तथापि, तज्ज्ञांच्या परिषदेला प्रत्यक्ष बैठक न घेता एकमताने निर्णय जाहीर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news