Viral News: २४ वर्षांपासून बेपत्ता असलेली आई जिवंत सापडली; न्यायालयात झाली माय-लेकीची भेट; कुठे होती इतकी वर्षे?

२००१ मध्ये अचानक गूढरीत्या गायब झालेली एक महिला तब्बल २४ वर्षांनंतर सुरक्षित आणि जिवंत सापडली. नुकतीच एका न्यायालयाच्या आवारात तिची आणि तिच्या मुलीची भेट झाली.
Viral News
Viral Newsfile photo
Published on
Updated on

Viral News

नॉर्थ कॅरोलिना : २००१ मध्ये अचानक गूढरीत्या गायब झालेली एक महिला तब्बल २४ वर्षांनंतर सुरक्षित आणि जिवंत सापडली आहे. मिशेल लिन हंडली स्मिथ असे या महिलेचे नाव असून, नुकतीच एका न्यायालयाच्या आवारात तिची आणि तिच्या मुलीची भेट झाली. दोन दशकांहून अधिक काळ ज्या आईच्या विरहात मुलांनी अश्रू ढाळले, ती समोर येताच लेकीने तिला कडकडून मिठी मारली. या भावनिक भेटीने न्यायालयाचा परिसर काही काळ हेलावून गेला होता.

ख्रिसमसच्या खरेदीला गेली आणि परतलीच नाही

ही घटना डिसेंबर २००१ मधील आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनातील एडन येथे राहणारी मिशेल (त्यावेळी ३८ वर्षे) ख्रिसमसची खरेदी करण्यासाठी व्हर्जिनिया येथील एका मॉलमध्ये जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती पुन्हा परतलीच नाही. तिच्या पतीने ३१ डिसेंबर २००१ रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर एफबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी तिचा शोध घेतला, मात्र काहीही हाती लागले नाही. मिशेल आपल्या मुलांना सोडून स्वतःहून कुठेही जाणार नाही, असा तपास अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, अनेक वर्षे शोध घेऊनही काहीच सुगावा नाही.

फेब्रुवारी २०२६ मध्ये रॉकिंगहॅम काउंटी शेरीफ कार्यालयाला मिशेलबाबत एक महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास केला असता मिशेल जिवंत आणि सुखरूप असल्याचे समोर आले. ती नॉर्थ कॅरोलिनामध्येच राहत असल्याचे निष्पन्न झाले, मात्र तिच्या गोपनीयतेचा आदर राखत पोलिसांनी तिचे नेमके ठिकाण उघड केलेले नाही.

Viral News
IPL Success Story: ट्रक ड्रायव्हरचा मुलगा; आई बनली कोच, गरिबीशी लढत IPL पर्यंत पोहोचला... वडिलांनी सांगितली भावनिक कहाणी

इतकी वर्षे ती कुठे होती?

इतकी वर्षे ती कुठे होती आणि का गायब झाली होती, याबाबत विचारले असता मिशेलने सांगितले की, "ते सर्व माझे वैयक्तिक प्रश्न होते. त्यावेळी मी मानसिक संघर्षातून जात होते आणि माझ्याकडे निघून जाण्यासाठी ठोस कारणे होती." स्थानिक शेरीफ सॅम पेज यांच्या मते, घरगुती वाद आणि वैयक्तिक समस्यांमुळे तिने घर सोडले असावे. या प्रकरणात कोणताही घातपात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयात झाली माय-लेकीची भेट

मिशेल बेपत्ता होण्यापूर्वी तिच्यावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा एक खटला दाखल होता. याच खटल्याच्या सुनावणीसाठी ती गुरुवारी न्यायालयात हजर झाली होती. तिची मुलगी अमांडा स्मिथ ही देखील तिला भेटण्यासाठी तिथे पोहोचली होती. दोघींनी एकमेकींना पाहताच अश्रूंचा बांध फुटला.

अमांडा म्हणाली, "ही भेट खूपच विचित्र आणि भावनिक होती. मी धावत जाऊन तिला मिठी मारली आणि आम्ही दोघीही रडलो. आयुष्य खूप छोटे आहे, तिच्यावर राग धरून बसण्यात अर्थ नाही. शेवटी ती माझी आई आहे आणि मला माझ्या आयुष्यात तिची साथ हवी आहे."

आई परतल्याने मुलगा नाराज!

मिशेल परतल्याने तिची मुलगी अमांडा आनंदी असली, तरी तिचा मुलगा रँडल याने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. रँडल म्हणाला, "ती इतकी वर्षे दूर होती. तिला आता माझ्या मुलांना भेटण्याचा अधिकार नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल राग नाही, पण प्रेमही उरलेले नाही." कुटुंबातील इतर सदस्यांमध्येही या घटनेमुळे समाधान आणि संभ्रमाचे वातावरण आहे.

मिशेलच्या गायब होण्यामागचे संपूर्ण सत्य अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, या एका भेटीने २४ वर्षांपासून सुरू असलेल्या एका गूढ प्रकरणाचा तूर्त सुखद अंत झाला आहे.

Viral News
Goa Suchana Seth Case | आईच काळ ठरली! चार वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येने देश हादरवणाऱ्या सूचना सेठ प्रकरणाला दोन वर्षे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news