

तेहरान; वृत्तसंस्था : इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणार्या अमेरिकन युद्धनौकेवर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात जहाजाचे नुकसान झाले आणि ते मागे हटले, असा दावा करण्यात आला. इराणी नौदलाच्या इशार्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा हल्ला केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, अमेरिकन सेंट्रल कमांडने हा दावा पुर्णतः नाकारला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, होर्मुझमध्ये अमेरिकेच्या कोणत्याही जहाजावर हल्ला झालेला नाही.
जास्क किनार्याजवळ ही घटना घडल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. या घटनेनंतर युद्धविरामाचा भंग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाई सुरू करू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वीच नौदलाला इराणी जहाजांवर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती.
अमेरिकेने समुद्री वाहतुकीसाठी जहाजांना ओमान प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुख्य मार्गाजवळील क्षेत्र धोकादायक असल्याचा इशाराही दिला आहे. कारण तेथे पाण सुरंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच अस्थिर बनली असून, जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणमध्ये गेल्या 65 दिवसांपासून इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात खंडित आहे.
होर्मुझमधील 3 हजार जहाजांसाठी प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम
सध्या सुमारे 3,000 जहाजे गेल्या 65 दिवसांपासून होर्मुज परिसरात अडकून पडली आहेत. या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिका मदत करेल आणि कोणत्याही अडथळ्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ मोहिमेतून जहाजांना सुरक्षित मार्गदर्शन करणार आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार, या मोहिमेत सुमारे 15 हजार सैनिक, 100 हून अधिक विमाने, युद्धनौका आणि ड्रोनचा सहभाग असेल. मात्र, इराणने स्पष्ट इशारा दिला आहे की, त्यांच्या प्रभावक्षेत्रात कोणतीही अमेरिकन लष्करी कारवाई सहन केली जाणार नाही. फ्रान्सने अमेरिकेच्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी हा उपक्रम अस्पष्ट असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
* इराणचे माजी कमांडर मोहसिन रजाई यांनी इशारा दिला की, होर्मुझ अमेरिकन सैन्याची कबर ठरू शकते.
* पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणने 14 मुद्द्यांचा नवीन शांतता प्रस्ताव अमेरिकेला दिला
* छोट्या बोटींमधून एका मोठ्या व्यापारी कार्गो जहाजावर हल्ला करण्यात आला; जीवितहानी नाही
* अमेरिकन नाकेबंदीमुळे 49 जहाजांनी मार्ग बदलत पर्यायी मार्ग स्वीकारले
* अमेरिकेत इंधन दरवाढ; पेट्रोलची किंमत 4.45 डॉलर प्रति गॅलनवर
* लेबनानमध्ये हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यात जमिनीवरील लढाई सुरू
* यूएई विमानसेवा सुरू; एमिरेटस्च्या 96 टक्के उड्डाण सेवा पुन्हा सुरू