

Donald Trump Nobel Peace Prize :
यंदाचं शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणाला मिळणार याची अख्ख्या जगाला उत्सुकता होती. या पुरस्काराच्या रेसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर होते. सगळीकडं त्यांना नोबेल प्राईस मिळणार का याची चर्चा सुरू होती. मात्र व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर सतत नोबेल प्राईजची मागणी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची निराशा झाली. त्यांच्यासाठी पाकिस्तानसह अनेक देशांनी जोरदार बॅटिंग केली होती.
मात्र आता व्हेनेझुएलाच्या मारिया मचाडो यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळं जरी डोनाल्ड ट्रम्प यांना यंदाचा शांततेचा पुरस्कार मिळालेला नसला तरी त्यांच अप्रत्यक्षरित्या या पुरस्काराशी नाव जोडलं गेलं आहे.
मारिया यांनी ट्विट केलं की, 'मी माझा यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा व्हेनेझुएलाच्या लोकांना आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करत आहे.' मारिया यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांनी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मला निर्णायक पाठिंबा दिला होता असं सांगितलं.
त्या पुढे म्हणतात, 'आज आम्ही विजय मिळवला आहे. आज डोनाल्ड ट्रम्प, अमेरेकेचे लोक, लॅटिन अमेरिकेचे लोक आणि लोकशाही मानणारे देश यांचा हा विजय आहे. हे सर्वजण स्वातंत्र्य आणि लोकशाही मुल्यांचा अंगिकार करणारे आहेत.'
दरम्यान, नोबेल कमिटीने मारिया यांना पुरस्कार देताना मारिया यांच्याबद्दल 'व्हेनेझुएलामधील लोकांमध्ये लोकशाहीचे हक्क रूजवण्यासाठी न थकता काम करणाऱ्या आणि देशात शांततेच्या मार्गानं परिवर्तन घडवून आणणाऱ्या असे गौरवाचे उद्गार काढले.
५८ वर्षांच्या मारिया यांनी ट्रम्प यांच्या माडुरो यांच्याविरूद्ध लष्करी दबाव आणण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. अमेरिकेने व्हेनेझुएलाजवळ युएस नौदल तैनात केलं आहेत. त्यांनी व्हेनेझुएलामधील हुकूमशाहीकडून लोकशाहीकडं सत्तांतर होत असताना हे सत्तांतर व्यवस्थित व्हाव यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून काही पावलं उचलली आहेत.