

Leopards can stand on Two Legs Watch Video
नवी दिल्ली : चपळ आणि हिंस्र प्राणी अशी ओळख असलेला बिबट्या हा चतुरही असतो हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिकार करण्यापूर्वी काही सेकंद बिबट्या हा अगदी माणसाप्रमाणेच दोन पायांवर उभा राहून अंदाज घेत होता, असे या व्हिडिओत दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर या राष्ट्रीय अभयारण्यात शिकारीसाठी फिरणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन दिवसांपूर्वी Latest Sightings – Kruger या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला 20 लाखांपेक्षा अधिका व्ह्यूज आणि दीड हजार पेक्षा जास्त कमेंट्स आहेत.
व्हायरल व्हिडिओत काय आहे?
बिबट्या शिकारीसाठी सावज शोधत आहे. रस्ता ओलांडल्यानंतर समोरच्या झाडाझुडपामध्ये सावज आहे का हे पाहण्यासाठी बिबट्या दोन पायांवर उभा राहतो. यामुळे त्याला झाडाझुडपातील हालचाली अधिक स्पष्टपणे दिसतात.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी देखील X (पूर्वीचे ट्विटर) प्लाटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणतात, बिबट्या या पृथ्वीवरील अष्टपैलू प्राण्यांपैकी एक आहे.
बिबट्या दोन पायांवर उभा राहिल्याची ही पहिलीच घटना आहे का?
नाही. बिबट्या हा चतुर आणि चपळ प्राणी असल्याने सावज कुठे लपून बसले आहे याचा अंदाज घेण्यासाठी बऱ्याचदा दोन पायांवर उभे राहतात. यापूर्वी मुनीश्वर राजा या वाईल्डलाईफ फोटोग्राफरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो टाकला होता. केनियातील मसाई मारा या अभयारण्यातील हा फोटो असून 25 मे 2024 रोजी हे फोटो शेअर केले होते. यात ते म्हणतात, तुम्ही कधी बिबट्याला दोन पायांवर उभं राहिलेलं पाहिलंय का. मी मसाई मारा येथे सफारीसाठी गेलो असताना दोन पायांवर उभा राहिलेला बिबट्याचा फोटो काढू शकलो. अवघ्या काही सेकंदांसाठी बिबट्या दोन पायांवर उभा राहतो आणि असे क्षण कॅमेऱ्यात कैद करणे हा अविस्मरणीय अनुभव आहे.
तर अमेझिंग नॅचर या X अकाऊंटवरून 1 सप्टेंबर 2023 रोजी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यातही शिकारीसाठी बिबट्या दोन पायांवर उभा राहताना दिसतो.
बिबट्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
बिबट्याचे शास्त्रीय नाव हे पँथेरा पार्डस आहे.
भारतात बिबट्यांची संख्या किती?
भारताच्या बिबट्यांच्या स्थितीबाबत केंद्र सरकारने 2024 मध्ये अहवाल प्रसिद्ध केला होता. यानुसार भारतात बिबट्यांची अंदाजे लोकसंख्या 13, 874 आहे.