

Lashkar-e-Taiba Terrorist Razaullah Nizamani Khalid shot dead
नवी दिल्ली : लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रजाउल्ला निजामानी खालिद उर्फ अबू सैफुल्ला खालिद पाकिस्तानात मारला गेला. अज्ञात हल्लेखोऱांनी त्याच्यावर गोळीबार केला. खालिद हा 2006 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, त्याचा सिंध प्रांतात रविवारी तीन अनोळखी हल्लेखोरांनी गोळ्या घालून खून केला.
खालिदने सन 2000 च्या सुरुवातीस नेपाळमधून लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कारवायांचे नेतृत्व केले होते. त्याने विनोद कुमार, मोहम्मद सलीम आणि रजाउल्ला अशी अनेक नावे घेतली होती. तो भारतात घडलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी दुपारी तो मटली येथील आपल्या राहत्या घरातून बाहेर पडला आणि सिंधमधील बादनी येथे एका चौकात अनोळखी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अबू अनस या लश्करच्या म्होरक्याचा खालिद हा निकटवर्तीय होता. नागपूर येथील RSS मुख्यालयावर 2006 मध्ये झालेल्या हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात सहभागी असलेले तिन्ही दहशतवादी सुरक्षा दलांनी ठार केले होते.
खालिद 2005 मध्ये बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही सामील होता.
त्या हल्ल्यात IIT चे प्राध्यापक मुनीशचंद्र पुरी ठार झाले होते आणि इतर चार जण जखमी झाले होते. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करून अबू अनसला आरोपी केले, तो अद्याप फरार आहे.
खालिद 2008 मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) च्या छावणीवर झालेल्या हल्ल्याचाही मास्टरमाइंड होता. त्या हल्ल्यात सात जवान आणि एक नागरिक ठार झाले होते. त्या वेळीही दोन दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते.
सन 2000 च्या मध्यापासून खालिद लष्कर-ए-तोयबाच्या नेपाळ मॉड्यूलचा प्रमुख होता. त्याच्याकडे तरूणांची भरती, आर्थिक व तांत्रिक मदत पुरवणे आणि भारत-नेपाळ सीमारेषेवरून लश्करच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींना मदत करणे अशी जबाबदारी होती.
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हे मॉड्यूल उघडकीस आणल्यानंतर खालिद नेपाळहून पाकिस्तानात परतला. त्यानंतर त्याने लश्कर आणि जमात-उद-दवाच्या अनेक नेत्यांशी जवळून काम केले. यात जम्मू-काश्मीरसाठी लश्करचा कमांडर युसुफ मुजम्मिल, मुजम्मिल इक्बाल हाश्मी आणि मोहम्मद युसुफ तैबी यांचा समावेश होता.
पाकिस्तानातील LeT व JuD नेतृत्वाने खालिदला सिंधमधील बदिन आणि हैदराबाद जिल्ह्यांमधून नव्या कार्यकर्त्यांची भरती करण्याचे तसेच संघटनेसाठी निधी उभारण्याचे काम सोपवले होते.
सिंधमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खालिदला गोळ्या लागल्यानंतर रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले.