

Khalistani Terrorist Arrested : कॅनडामध्ये भारतीय दूतावासाला धमक्या देण्याचे सत्र सुरू असल्याने भारताने कठोर भूमिका घेतली होती. आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा साथीदार इंदरजीत सिंग गोसल याला कॅनडातील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. गोसल हा पन्नूचा सर्वात जवळचा सहकारी मानला जातो. त्याच्यावर आता शस्त्र-संबंधित गुन्ह्यांच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे.
इंदरजीत सिंग गोसल हा फुटीरतावादी संघटना 'सिख फॉर जस्टिस' चा प्रमुख असलेल्या पन्नूचा पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणूनही ओळखला जातो. कॅनडामधील भारतविरोधी कृत्यांमुळे भारत सरकार सातत्याने नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे गोसलची अटक भारताच्या दबावाचा परिणाम असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नुकतेच कॅनडाला कठोर संदेश दिला होता. कॅनडाच्या मार्क कार्नी सरकारवर खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता. डोवाल यांच्या कठोर संदेशानंतर पन्नूच्या साथीदारावर झालेली कारवाई सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
जून २०२३ मध्ये हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यूनंतर इंदरजीत हा अमेरिकेतील खलिस्तानी संघटना 'सिख फॉर जस्टिस' साठी कॅनडामध्ये मुख्य आयोजक बनला होता. ३६ वर्षांच्या इंदरजीतला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्रेटर टोरोंटो एरिया (GTA) मध्ये एका हिंदू मंदिरातील हिंसक घटनेप्रकरणी कॅनडा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्यावेळी त्याची सुटका करण्यात आली होती. इंदरजीत सिंग गोसल हा कॅनडामध्ये खलिस्तानसाठी समन्वयक आहे. त्याला आता शस्त्र-संबंधित गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.