पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडातील एका हिंदू मंदिरात भाविकांना मारहाण करण्यात आली आहे. काही लोक खलिस्तानी झेंडे घेऊन मंदिराच्या आवारात घुसले आणि त्यांनी भाविकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदूंवरील या हल्ल्यानंतर जोरदार टीका होत आहे.
ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिर संकुलात खलिस्तानी अतिरेक्यांनी हिंदू-कॅनेडियन भाविकांवर हल्ला केल्यानंतर, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि कॅनडाचे खासदार चंद्र आर्य यांनी हिंसाचाराचा निषेध केला. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, कॅनडात प्रत्येकाला त्यांचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे.
मंदिरातील हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिर परिसरात काही लोक खलिस्तानी झेंडे घेऊन दिसत आहेत. हे लोक लोकांना मारहाण करत आहेत. तिथे एकही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस दिसत नाही, त्यामुळे कॅनडात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याची स्थिती आहे. एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नसल्याने कॅनडाच्या पोलिसांवरही खलिस्तानींना संरक्षण दिल्याचा आरोप होत आहे.