

जम्मू; पुढारी वृत्तसेवा : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करून जम्मू-काश्मिरात घुसण्यासाठी आत्मघातकी दहशतवादी अर्थात फिदाईन टोळ्या सज्ज असल्याची व सीमेवरही पाकिस्तानकडून हल्ले होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्याने 'एलओसी'वर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांत एलओसीजवळ घटना वाढल्या आहेत. कुपवाडात नुकतेच पाच दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नाान घातलेे; तर मंगळवारीही याच भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, मोठ्या संख्येने शस्त्रे व दारूगोळा घेऊन दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण सुरक्षा दल सतर्क असल्याने आतापर्यंतचे सारे प्रयत्न हाणून पाडले गेले आहेत.
लष्कराने हा धोका ध्यानात घेत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सीमेवर जादा कुमक तैनात करण्यात आली असून गस्ती पथकांच्या फेर्याही वाढवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून सीमेवर नजर ठेवण्यात येत असून सैन्य व सीमा सुरक्षा दलाला हाय अलर्ट देण्यात आला आहे.
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार घुसखोरीचे प्रकार करायला लावून भारतीय लष्कराचे लक्ष विचलित करीत आहे. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर आणि बॉर्डर अॅक्शन टीम मोठ्या हल्ल्याची तयारी करीत आहेत. शिवाय काश्मिरात बर्फ वितळायला लागले असून त्या संधीचा फायदा घेऊन त्यांचा घुसखोरी करण्याचा डाव आहे. आत्मघातकी दहशतवाद्यांच्या काही टोळ्या सीमेपलीकडे घुसखोरीच्या तयारीत आहेत. याशिवाय काही दहशतवादीही घुसण्याच्या तयारीत आहेत.