

दमास्कस/बैरुत/तेहरान; वृत्तसंस्था : हमास (पॅलेस्टाईन), हिजबुल्ला (लेबनॉन), हुती (येमेन), इराणनंतर (खोमैनी) इस्रायलने पाचवा शत्रू म्हणून सीरियाला अंगावर घेतले आहे. सीरियातील दमास्कस इस्रायलने जोरदार हवाई हल्ला चढवला असून, त्यात मृत हुजबुल्ला प्रमुख नसराल्ला याचा जावई हसन जाफर अल-कासिर मारला गेला. हसन जाफरसह त्याचे दोन साथीदारही मारले गेले. दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात नसराल्लाचा चुलत भाऊ तसेच हिजबुल्लाचा नवोदित म्होरक्या हाशिम सैफिद्दीन याचाही खात्मा झाला. इस्रायलने तसा दावाही केला आहे. इस्रायलच्या विमानांनी एका भूमिगत बंकरमध्ये सुरू असलेल्या हिजबुल्लाच्या बैठकीवर बॉम्बचा वर्षाव केला. सैफिद्दीनही या बैठकीत होता. सैफिद्दीन या बैठकीत होता, असे इस्रायल लष्करातील सूत्रांचे म्हणणे आहे. हिजबुल्लाकडून मात्र या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. याआधी 27 सप्टेंबर रोजी इस्रायलने बैरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर बॉम्ब टाकून हिजबुल्लाचा प्रमुख नसरल्लाचा खात्मा केला होता. तेव्हाही हिजबुल्लाने उशिराच त्याला दुजोरा दिला होता.
इस्रायलच्या रणांगणातील शत्रूंची संख्या आता पाच
हमास, हिजबुल्ला, हुती, इराणनंतर सीरियावर हल्ले
नसराल्लाचा दफनविधीही शुक्रवारी झाला. त्याला गुप्त ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दफन करण्यात आले आहे. जाहीररित्या दफनविधी केला तर गर्दी होईल आणि इस्रायल या गर्दीवर हल्ला करू शकतो, या भीतीतून हिजबुल्लाने तसे केले.
नसराल्लाच्या निधनाबद्दल तेहरानमध्ये (इराण) शुक्रवारी शोकसभा झाली. ग्रँड मशिदीतून बोलताना इराणचे सर्वोच्च शिया नेते आयातुल्लाह खोमैनी यावेळी म्हणाले, जगाच्या पाठीवरील सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन आता अमेरिका व इस्रायलशी लढायला हवे. आपापल्या देशात मोर्चे काढून, घोषणा देऊन मनाचे समाधान वगळता काहीही उपयोग नाही, असेही त्यांनी सांगितले.
हिजबुल्लाचे हल्ले : हिजबुल्लाने इस्रायलवर 230 क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्रायलचे काहीही नुकसान नाही. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणांनी हे हल्ले निष्प्रभ केले.
18 जण ठार : इस्रायलने वेस्ट बँकमधील तुलकर्म शहरातील निर्वासितांच्या छावणीवर हवाई हल्ले केले. यात 18 जणांचा मृत्यू झाला.
28 जण ठार : लेबनॉनमध्ये एका हॉस्पिटलवर क्षेपणास्त्र कोसळल्याने 28 आरोग्य कर्मचारी ठार झाले. जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल चिंता व्यक्त केली.
गाझात 99 ठार : गाझावरील इस्रायलच्या एका हल्ल्यात 99 जणां मृत्यू झाला, 169 जण जखमी झालेत, असा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला.
अनिसीचा खात्मा : हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र युनिटचा मुख्य तज्ज्ञ महमूद युसेफ अनिसी याचा खात्मा झाल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे. अनिसी गेली 15 वर्षे हिजबुल्लात होता.