

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलने उत्तर गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात (Israel strikes Gaza) किमान ७७ लोक ठार झाले आहेत. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १२ वर्षाखालील मुलांचाही समावेश आहे. गाझामध्ये ७ ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यांत किमान ४३ हजार लोक मारले गेले. तर सुमारे १ लाख लोक जखमी झालेत.
'अल जझीरा'च्या वृत्तानुसार, गाझापट्टीच्या उत्तरेकडील बीट लाहिया येथील निवासी इमारतीवरील हल्ल्यात ७७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. घटनास्थळावरील काही छायाचित्रे समोर आली असून त्यात क्रॉकिटच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले महिला आणि मुलांचे मृतदेह बाहेर काढले जात असल्याचे दिसून आले आहे. काही लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. लोक झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर काँक्रीटचा भाग कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ले केले होते. तसेच अनेक दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. यात १,२०० जणांचा मृत्यू झाला. तर २५० लोकांचे अपहरण करण्यात आले होते. हमासच्या या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझावर जोरदार हल्ले केले. यामुळे गाझापट्टीत मोठी जीवितहानी झाली आहे. गेले वर्षभर येथे हल्ले सुरु आहेत.