पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणवर हल्ला करून ज्यू राजवटीने दोन रात्री मोठी चूक केली असून, आता , इस्रायलला इराणी लोकांचे सामर्थ्य, दृढनिश्चयाची शक्ती समजावून सांगावी लागेल, अशा शब्दांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलला धमकी दिली आहे.
खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'ज्यू राजवटीने दोन रात्री चुकीचे पाऊल उचलले. त्यांना इराण माहीत नाही आपल्याला इराणी लोकांचा दृढनिश्चय, पुढाकार आणि सामर्थ्य दाखवावे लागेल. आमच्या अधिकाऱ्यांनी इराणी लोकांची शक्ती शत्रूला दाखवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे अचूकपणे समजून घेणे आणि या देशाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी जे काही आहे ते करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
इस्रायलने (दि. 26) शनिवारी सकाळी इराणवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना इराणनेदुजोरा दिला. इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करून इस्रायलने हे हल्ले केले. मात्र, या हल्ल्यांमध्ये किती नुकसान झाले, याबाबतची माहिती जाहीर केलेली नाही. इराणने या हल्ल्यांनंतर एक निवेदन जारी केले की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलचा हल्ला हाणून पाडल्याचा दावाही केला आहे..यामुळेच इराणच्या सर्वोच्च नेत्याने इस्रायलच्या हल्ल्यांबाबत अतिशयोक्ती करू नये आणि त्यांना फार हलके घेऊ नये, असेही म्हटले आहे. मात्र, त्यांनी प्रत्युत्तराच्या हल्ल्यांबाबत थेट बोलणे टाळले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे नुकसान झाले आहे. इराणला ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील, असे मानले जात आहे. इराणच्या लष्करासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इस्त्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांच्या विरोधात प्रत्युत्तराची कारवाई केल्यास ते पुन्हा हल्ला करतील.