

अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर अधिकृतपणे हल्ला केला आहे. हा हल्ला भारतीय वेळेनुसार आज (दि. २२ जून) पहाटे ४.३० वाजता झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले आहे की, आम्ही फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानसह इराणच्या तीन अणुस्थळांवर अतिशय यशस्वी हल्ला केला आहे. सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डोच्या प्राथमिक स्थळावर बॉम्बचा पूर्ण पेलोड टाकण्यात आला आहे. सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, मी इराणमधील आमच्या अत्यंत यशस्वी लष्करी कारवाईबद्दल व्हाईट हाऊसमध्ये रात्री १०:०० वाजता राष्ट्राला संबोधित करेन. अमेरिका, इस्रायल आणि जगासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. इराणने आता हे युद्ध संपवण्यास सहमती दर्शवावी, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले आहे.
इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. नेतान्याहू यांनी म्हटलं आहे की, "धन्यवाद अध्यक्ष ट्रम्प, तुम्ही इराणमधील अणु तळांवर हल्ला करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. हे इतिहास बदलेल. इस्रायलने म्हटले आहे की ते इराणविरुद्ध "दीर्घ मोहिमेसाठी" सज्ज आहे. आम्ही इराणमधील अणु आणि लष्करी स्थळांवर हल्ला करत आहोत. गेल्या आठवड्यात संघर्ष वाढल्यापासून इस्रायलमध्ये अधिकाऱ्यांनी किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
आज इस्फरान आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा १० वा दिवस आहे. १३ जूनपासून इस्फरानने १० इराणी अणुशास्त्रज्ञांना ठार मारले आहे. शनिवारी इराणी सैन्याचे ३ कमांडर आणि ४ सैनिक ठार झाल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वृत्तसंस्थेनुसार, १३ जूनपासून इराणमध्ये ६५७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तथापि, इराणच्या आरोग्य मंत्रालयाने केवळ ४३० नागरिकांचा मृत्यू आणि ३,५०० जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. त्याच वेळी, इस्रायलमध्ये २४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अमेरिका इस्रायली हल्ल्यात सहभागी झाली तर ते प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी इराणने दिली हाेती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेने युद्धात सक्रियपणे भाग घेतला तर ते सर्वांसाठी खूप धोकादायक असेल. ट्रम्प यांच्यासाठी हा धोकादायक निर्णय असेल.